Pune Drug Case : ड्रग्जचे धागेदोरे नाशिक, मुंबई व्हाया पुणे; आणखी 7 जणांचा शोध; पाटील, बलकवडेच्या कोठडीत वाढ | पुढारी

Pune Drug Case : ड्रग्जचे धागेदोरे नाशिक, मुंबई व्हाया पुणे; आणखी 7 जणांचा शोध; पाटील, बलकवडेच्या कोठडीत वाढ

पुणे : ससून रुग्णालयातून ड्रग्जचे रॅकेट चालविणारा ललित पाटील याच्याशी संबंधित आणखी सात आरोपींची नावे पोलिस तपासात निष्पन्न झाली आहेत. समाधान बाबाजी कांबळे, शिवाजी शिंदे, जिशान इक्बाल शेख, राहुल पंडित ऊर्फ रोहितकुमार ऊर्फ अमितकुमार (सर्व रा. नाशिक), हरीश पंत, इम्रान शेख, गोलू (तिघेही रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. त्यांमार्फत ड्रग्ज बनविण्यासाठी
लागणारा कच्चा माल पुरविण्यापासून तयार झालेले पदार्थ विक्री करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

सातपैकी दोन आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून, अन्य पाच आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी (दि. 16) न्यायालयाला दिली. गुन्ह्यातील मुख्य आरोपी ललित पाटील व त्याचे साथीदार नाशिक येथील एमआयडीसीमध्ये ज्या कारखान्यात ड्रग्ज तयार करीत होते तो कारखाना समाधान कांबळे याचा आहे. शिवाजी शिंदे हा ड्रग्ज तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवत होता.

हरीश पंत, जिशान शेख आणि राहुल पंडित हे ड्रग्ज तयार करीत, तर इम्रान शेख आणि गोलू हे दोघे तयार झालेल्या ड्रग्जची विक्री करीत होते. अटकेत असलेले आणि फरारी असलेल्या आरोपींनी ड्रग्ज विक्रीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केली असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आल्याने गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी अटक आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकार पक्षातर्फे न्यायालयाला करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी आरोपींच्या कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? यासह तपासादरम्यान येणार्‍या विविध मुद्यांची चौकशी करायची आहे.

त्यामुळे भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्या पोलिस कोठडीत आठ दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नीलम यादव-इथापे यांनी केली. नव्याने निष्पन्न झालेल्या आरोपींपैकी दोन आरोपी हे मुंबईत दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अटकेत आहेत. त्यांना या गुन्ह्यात अद्याप ताब्यात घेता आले नाही, हे पोलिसांचे अपयश आहे. गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. त्यामुळे आरोपींच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद आरोपींचे वकील संदीप बाली यांनी केला. मात्र, पाटील, बलकवडेच्या पोलिस कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

एमडी विकून खरेदी केले सोने

भूषण पाटील याच्या घरझडतीत गुन्ह्याच्या अनुषंगाने आठ पेन ड्राईव्ह सापडले आहेत. तसेच अभिषेक बलकवडे याच्याकडून तीन किलो सोने जप्त करण्यात आले आहे. मेफेड्रॉनच्या विक्रीतून आलेल्या पैशांतून ललित पाटील याने पाच किलो सोने घेतल्याचे अटक आरोपींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.

सातपैकी दोघे मुंबईत दाखल गुन्ह्यात अटकेत

जिशान शेख आणि शिवाजी शिंदे हे मुंबईत दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सध्या अटकेत आहेत. या दोघांना बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाच्या परवानगीने हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने आत्तापर्यंत 12 साक्षीदारांकडे तपास केला आहे.

हेही वाचा

Pune News : एसीपी सिव्हिल ड्रेसमध्ये कोर्टात; न्यायालयाने बजावली नोटीस; नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका

अफगाणिस्तानकडून राजसत्तेचा पाडाव

येरवड्यातील ‘त्या’ जागेवर पोलिस ठाणेच

Back to top button