Pimpri News : खुल्या व्यायामशाळेतील साहित्याने टाकली मान | पुढारी

Pimpri News : खुल्या व्यायामशाळेतील साहित्याने टाकली मान

आकुर्डी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील उद्यानांमध्ये बसविलेल्या ओपन जिममध्ये शहरातील नागरिकांचा स्वास्थ्य आलेख वाढविण्याकरिता तसेच आरोग्यमान उंचावण्याकरिता ठिकठिकाणी महापालिकेतफे ओपन जिम सुरू करण्यात आले. मात्र, 60 पेक्षा जास्त व्यायामशालेत निकृष्ट दर्जाचे बेअरिंग्ज बसवल्याने आठच महिन्यांत ते खराब झालेत. विशेष म्हणजे आठच महिन्यांपूर्वी हे सर्व उपकरणांची दुरुस्ती हनी फन एन थ्रिल या कंपनीमार्फत करण्यात आली होती.

थंडीचे दिवस असूनही नागरिकांना ओपन जिमचा लाभ व्यायामाकरिता घेता येत नसल्याने सर्व साहित्य पडून आहेत. यामुळे क्रीडा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. 15 जानेवारी 2023 मध्ये प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्याध्यक्ष विजय पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे खेळणी दुरुस्तीची क्रीडा विभागाकडून निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार, लाखो रुपये ओपन जिमच्या दुरुस्तीसाठी खर्च केले गेले. या खेळणीसाठी सर्वात महत्त्वाचा भाग हा बेअरिंग्जचा होता; मात्र निकृष्ट दर्जाचे बेअरिंग्ज टाकून मोठ्या प्रमाणात बिले मंजूर केल्याचे निदर्शनास आले आहे.

दुरुस्तीसाठी पाच लाखांचा केला खर्च

आठच महिन्यांपूर्वी बेअरिंग्ज दुरुस्तीची कामे 60 पेक्षा जास्त व्यायामशालेत करण्यात आली होती. यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती मात्र, समितीचा अहवाल न घेताच दुरुस्तीची कामे करण्यात आली. लाखो रुपयांचे साठेलोटे करण्यात आले. दुरुस्तीसाठी पाच लाख रुपयांचा खर्च केला गेला होता.

व्यायामासाठी येणार्‍यांना होतोय खुब्याचा त्रास

निकृष्ट बेअरिंग्जमुळे व्यायामाचे साहित्यातून आवाज येणे, आऊट होणे, बेअरिंग्जमधून आवाज येणे, जाम होणे या प्रकारांमुळे व्यायाम करणार्‍यांपैकी काहींना खुब्याचा त्रास होत आहे.

या ठिकाणच्या ओपन जिमची दुरवस्था

नाना नानी उद्यान, संत ज्ञानेश्वर उद्यान, संत तुकाराम उद्यान, गणेश तलाव उद्यान, दुर्गा टेकडी, अप्पूघर, दक्षिण मुखी मारुती मंदिर उद्यान, शुभम पार्क, आदी उद्यानांमधील ओपन जिमची जसे की, सायकलिंग, एअर वॉकर्स, रोईंग, चेस्ट प्रेस, डबल बार, स्कॉय वॉकर, डबल ट्विस्टर सिटींग ही उपकरणे बेअरिंग्जसअभावी खराब झाली आहेत.

तीन प्रकारच्या जिम आहेत. काही जिममध्ये 2017 मध्ये बेअरिंग्ज बसविले होते. दोन्ही एजन्सीजना सूचना केल्या आहेत. त्यातील ओपन जिममधील नादुरुस्त बेअरिंग्ज पुन्हा बदलल्या जातील. थंडीचे दिवसांत व्यायाम करणार्‍यांची संख्या वाढते. त्यांची गैरसोय होणार नाही याची आम्हाला जाणीव आहे.

-मिनिनाथ दंडवते, उपायुक्त क्रीडा विभाग

हेही वाचा

अजित पवार गटाला धक्का; प्रदेश सरचिटणीस पठाण यांचा राष्ट्रवादीला रामराम

Nagar News : जायकवाडीस पाण्याविरुद्ध वज्रमूठ! आ. काळेंचा पुढाकार

पालिकेत भ्रष्टाचार झाला हे उदयनराजेंनी मान्य केले : आ. शिवेंद्रराजे भोसले

Back to top button