अजित पवार गटाला धक्का; प्रदेश सरचिटणीस पठाण यांचा राष्ट्रवादीला रामराम | पुढारी

अजित पवार गटाला धक्का; प्रदेश सरचिटणीस पठाण यांचा राष्ट्रवादीला रामराम

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस चंगेजखान पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला रामराम करत बाहेर पडले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या : 

पक्षाच्या कामकाजात विश्वासात घेतले जात नसल्याने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे. उध्दव ठाकरे यांची त्यांनी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली सव्वादोन तास त्यांनी चर्चा केली.

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत आजपर्यंत पठाण एकनिष्ठ होते. राष्ट्रवादीसाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांच्या गटाशी असलेले राजकीय संबंधही तोडले होते. त्यानंतर त्यांनी शरद पवार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र सेवा दलाचे पहिले अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली होती.

कुरुंदवाड पालिकेत पठाण हे राष्ट्रवादीचे पहिले नगराध्यक्ष झाले. हज कमिटी, मौलाना आझाद महामंडळाचे संचालक या पदावरही त्यांनी काम केले. २०११ सालच्या पालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवून ८ नगरसेवक निवडून आणले होते. अजित पवार गटाशी ते एकनिष्ठ होते. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांची पक्षात कुचंबना होत होती. पक्षाचा विस्तार करताना त्यांच्यासमोर अडचणी निर्माण केल्या जात होत्या. ही नाराजी उघड होती. पक्षात निर्णय घेत असताना विश्वासातही घेतले जात नव्हते त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

याभेटीत त्यांच्या सोबत शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. त्यामुळे पठाण यांचा शिवसेनेचा प्रवेश पक्का मानला जात आहे.

हेही वाचा : 


Back to top button