Pune Crime News : पुण्यात बेकायदा वास्तव्य करणार्‍या 11 बांगलादेशींना अटक | पुढारी

Pune Crime News : पुण्यात बेकायदा वास्तव्य करणार्‍या 11 बांगलादेशींना अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसर भागात बेकायदा वास्तव्य करणार्‍या 11 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले. लष्कराची गुप्तचर यंत्रणा, तसेच पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आठ जणांसह तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. बांगलादेशी नागरिकांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर सात बांगलादेशी नागरिकांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. हडपसर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तशी नोंद पोलिस ठाण्यातील पुस्तिकेत (स्टेशन डायरी) केली होती. चौकशीत सात जणांनी बांगलादेशातील रहिवासी असल्याचे मान्य केले होते.

मात्र, आरोपींकडे बांगलादेशी असल्याबाबतची कागदपत्रे न मिळाल्याने पोलिसांनी त्यांना चौकशी करुन सोडून दिले होते. या प्रकरणाचा लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून तपास करण्यात येत होता. त्यानंतर चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भारतात घुसखोरी करणार्‍या बांगलादेशी नागरिकांना आधारकार्ड, पॅनकार्ड, तसेच मतदार ओळखपत्र मिळवून दिल्याचे उघडकीस आले आहे. अटक करण्यात आलेले पुण्यात मजुरी करत होते.

मजुरीतून मिळालेले पैसे बांगलादेशातील नातेवाइकांकडे पाठवित असल्याचे उघड झाले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके तपास करत आहेत. दरम्यान, पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दोन दिवसांपूर्वी बुधवार पेठेत बेकायदा वास्तव्य करणार्‍या महिलांना पकडले होते. गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यात बेकायदा वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी घुसखोरांविरुद्धची कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

हेही वाचा

Navratri 2023 : अंबाबाईची नऊ दिवस विविध रूपांत पूजा

पोलिस भरतीत बनावट कागदपत्रे; पुण्यात 10 जणांवर गुन्हा

मराठा समाजाच्या आरक्षणावरून फडणवीसांना टार्गेट केले जातेय : प्रवीण दरेकर

Back to top button