मराठा समाजाच्या आरक्षणावरून फडणवीसांना टार्गेट केले जातेय : प्रवीण दरेकर | पुढारी

मराठा समाजाच्या आरक्षणावरून फडणवीसांना टार्गेट केले जातेय : प्रवीण दरेकर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका विशिष्ट समाजाचे म्हणून त्यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप करत भाजपा विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याला शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.

मराठा समाजाला सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिले. संपूर्ण महाराष्ट्र हे जाणतो. फडणवीस केवळ आरक्षण देऊन थांबले नाही तर ते आरक्षण हायकोर्टात त्यांनी टिकवलेदेखील. सुप्रीम कोर्टात ते टिकले नाही. कारण अडीच वर्षे चाललेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने दुर्लक्ष केले, याकडे लक्ष वेधून प्रवीण दरेकर म्हणाले, नारायण राणे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी सकारात्मक रिपोर्ट दिला. त्यानंतर फडणवीस यांनी पुढाकार घेऊन आरक्षण दिले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कुठल्याही कृतीवर संशय होऊ शकत नाही. पदभरतीचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे राणे, फडणवीस, शिंदे असे तिघेही मराठा आरक्षणाच्या बाजूने असतानाही टार्गेट देवेंद्र फडणवीस यांना केले जात आहे. यात निश्चितच राजकीय वास येतोय. यांचा बोलवता धनी कोण आहे, असा सवालही दरेकर यांनी जरांगे-पाटील यांनी केलेल्या आरोपांवर केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुणरत्न सदावर्ते यांचा काहीही संबंध नाही हे जगाला ठाऊक आहे. परंतु शरद पवार गटाकडून सातत्याने अशा प्रकारचा प्रचार केला जातोय व तीच भाषा जरांगे यांच्या तोंडून येत असेल तर ते कुणाच्यातरी सांगण्यावरून बोलत आहेत, असा थेट आरोपही दरेकर यांनी केला.

समाजाला गर्दी नवी नाही

अंतरवाली सराटीमध्ये शनिवारी झालेल्या जरांगे पाटील यांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. त्याबद्दल दरेकर म्हणाले, मराठा समाजाने गर्दी पहिल्यांदा पाहिली नाही. यापूर्वी लाखोंचे मोर्चे झाले. त्यांना कुठलाही नेता नव्हता. मराठा समाज गर्दी असतानाही शांततेत मोर्चा काढू शकतो हा आदर्श जगासमोर मराठा समाजाने घालून दिला. त्यामुळे मराठा समाजाला कुणीही भडकवू शकत नाही.

Back to top button