Pune News : कळमोडीची उंची वाढविण्याचा पर्याय | पुढारी

Pune News : कळमोडीची उंची वाढविण्याचा पर्याय

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा :  शिरूर तालुक्यातील 12 गावांच्या पाणीप्रश्नावर आंदोलनाची तयारी सुरू असताना दुष्काळग्रस्त पाणी हक्क संघर्ष समितीचे प्रतिनिधी या भागातील लोकप्रतिनिधींची चर्चा करीत आहेत. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची शासकीय विश्रामगृह पुणे भेट घेत शिष्टमंडळाने चर्चा केली. या वेळी चासकमान, कळमोडी, डिंभे धरणात अतिरिक्त शिल्लक असलेल्या पाण्याचे सर्वेक्षण करून त्यावर हक्क सांगू. त्याचबरोबर कळमोडी धरणाची उंची वाढवून वाढलेल्या पाण्याचा फायदा वंचित गावांना होईल या पर्यायाची चाचपणी करता येईल, असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या :

गेली महिनाभर लोकप्रतिनिधींशी चर्चा करून पाणीप्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, त्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर 12 गावच्या प्रतिनिधींनी खा. कोल्हे यांच्याशी चर्चा केली. या वेळी केंदूरचे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पर्‍हाड यांनी पाणीप्रश्नाची पार्श्वभूमी सांगितली. त्यावर कोल्हे यांनी सांगितले की, केवळ बैठका घेऊन चालणार नाही. त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राज्य शासनात बसलेल्या मंत्र्यांचीदेखील प्रामाणिक इच्छा असायला हवी.

केंदूर, पाबळ, धामारी परिसरातील गावांना थिटेवाडी बंधार्‍यातून पाणी देणे शक्य असेल, तर थिटेवाडी बंधार्‍यात पाणी यायला हवं आणि ते पाणी कळमोडी धरणाची दीड ते दोन मीटर उंची वाढवून उपलब्ध पाणी या गावांना देता येईल का हा पर्याय तपासला पाहिजे.
आंबेगाव बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी डिंभे धरणाच्या कालव्यामधून उपसा सिंचन कान्हूर मेसाई, मिडगुल वाडी, चिंचोली मोराची या गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागू शकतो, असे सांगितले. या वेळी केंदूरचे सरपंच अमोल थिटे, पाबळचे सरपंच सचिन वाबळे, सनी थिटे, भरत साकोरे, गणेश साकोरे, भास्कर पुंडे, सुधीर पुंडे, सुदाम तळोले, बन्सी पर्‍हाड आदी उपस्थित होते.

Back to top button