Pune Dark Night : पुण्याला झिंग डार्क नाईटची! | पुढारी

Pune Dark Night : पुण्याला झिंग डार्क नाईटची!

पुणे : डार्क वेब नेटवर्क, फूड डिलिव्हरीच्या माध्यमातून तरुणाईला नशेच्या जाळ्यात खेचणारी एक मोठी यंत्रणा पुणे आणि परिसरात हातपाय पसरत आहे. ड्रगमाफियांनी शिक्षण संस्था, पब, हॉटेल्स, त्याचबरोबर शहरातील चौकांपर्यंत एलएसडी (स्टॅम्प) आणि गांजा, कोकेन, चरस, हेरॉइन असे अमली पदार्थ विक्रीचे जाळे विणले आहे. केवळ दहा महिन्यांत पोलिसांनी गांजाप्रकरणी 164 गुन्हे दाखल केले आहेत. अमली पदार्थ लावलेल्या स्टॅम्पचे 1 हजार तुकडे आणि गांजाचा एक टन साठा हस्तगत केला आहे. ही केवळ नोंद झालेली आकडेवारी आहे. मात्र, पोलिसांची करडी नजर चुकवून तरुणाईच्या हातात गेलेले अमली पदार्थ किती असतील, कोण जाणे?

डीजेच्या तालावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई आणि त्यांच्या रात्रीला अधिकच शानदार करणारी मद्याबरोबरच अमली पदार्थाची नशाखोरी. त्यामुळे मायानगरी मुंबईपाठोपाठ पुणे हे आता अमली पदार्थ तस्करांच्या रडारवर असल्याचे दिसून येते. पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातून सुरू असलेल्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला. न्यायालयीन कैदी असलेला ललित पाटील हा हे रॅकेट चालवत होता. पुढे तो पोलिसांच्या ताब्यातून पळाला. त्यामुळे पुण्यात किती मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची विक्री होते हे समोर आले. ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील हे ड्रग विक्रीचे रॅकेट चालवत होते.

अमली पदार्थांचा व्यवसाय म्हणजे कमीत-कमी मेहनतीत जास्तीत-जास्त पैसा. शहरातील अमली पदार्थाचा व्यवसाय गुंतागुंतीचा आहे. झोपडपट्टी, लेबर कॅम्पपासून ते आलिशान वस्त्यांपर्यंत ही काळी दुनिया पसरलेली आहे. फक्त जो तो त्याच्या ऐपतीनुसार अमली पदार्थांची नशा करतो आहे. 80 ते 90 च्या दशकात अमली पदार्थांमध्ये कोकेन, ब—ाऊन शुगरची चलती होती. मात्र, काळ बदलला, तसा हा व्यवसायदेखील तेवढ्याच गतीने बदलला. आता कोकेन, ब—ाऊन शुगरला मागे टाकून अमली पदार्थांनी त्याची जागा घेतली आहे.

गुन्हेगारांनी थेट औद्योगिक वसाहतीत ड्रग तयार करण्याचे कारखाने थाटले आहेत. पुण्याभोवती अमली पदार्थ तस्करांचा विळखा घट्ट होताना दिसतो आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गांजा, चरस, कोकेन, मेफेड्रॉन, एलएसडी स्टॅम्प, अफू, ब—ाऊन शुगर यांचा समावेश होता. तरीही तस्करांपर्यंत पोहोचण्यात यंत्रणांना अपयश आले आहे. कारवाईदरम्यान अटक केलेले केवळ प्यादे असतात. त्यांचे मास्टरमाइंड नव्या साखळीद्वारे नशाखोरीची मंडी लावतात. ससून ड्रग प्रकरणात थेट ड्रगचे उत्पादन करणार्‍या आरोपींनाच पोलिसांनी पकडले आहे.

शहरात अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यामध्ये प्रामुख्याने नायजेरियन गुन्हेगार आघाडीवर आहेत. गोवा, मुंबई येथून कोकेन, ब—ाऊन शुगरची तस्करी ते पुण्यात करतात. त्यानंतर शहरातील कोरेगाव पार्क, मुंढवा, बाणेर, हिंजवडी येथील उच्चभ्रू परिसरातील पब, हॉटेलमध्ये त्यांची विक्री करतात. राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश येथून गांजा पुणे, मुंबई शहरात पुरवला जातो. हिमाचल प्रदेशातून रेल्वेमधून अफीम पुण्यात दाखल होते.

10 महिन्यांत 164 गुन्हे, तर 1 टन गांजा पकडला

कोकेन, गांजा, ब्राउन शुगर-हेरॉईन, अफू, दोडत्तचुरा, चरस, मेफेड्रॉन (एमडी), एलएसडी, एमडीएमए, मशरूम, हशीश अशा अमली पदार्थांची तस्करी

  • गोवा, मुंबई येथून कोकेन, ब—ाउन शुगरची तस्करी पुण्यात
  • पुण्यातील तस्करीत नायजेरियन गुन्हेगार आघाडीवर
  • झोपडपट्टी, लेबर कॅम्पपासून ते आलिशान वस्त्यांपर्यंत नेटवर्क
  • उच्चभ्रू परिसरातील पब, हॉटेलमध्ये विक्री
  • कमीत-कमी मेहनतीत जास्तीत-जास्त पैसा
  • गांजा तस्करीचे प्रमाण शहरात सर्वाधिक
  • राजस्थानी तस्कर गांजा विक्रीत आघाडीवर

राजस्थानी तस्कर आघाडीवर

गेल्या काही दिवसापासून गांजा तस्करीत राजस्थानी तस्करांचा अंमल वाढताना दिसत आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईतून हे समोर आले आहे. इतर अमली पदार्थांच्या तुलनेत गांजा सहज आणि कमी पैशात उपलब्ध होतो. त्यामुळे अनेक पार्ट्यांत पार्टी ड्रग म्हणून गांजाचा वापर केला जातो.

पुण्यात नशेचा बाजार

कॉलेज तरुण-तरुणींना एलएसडी (स्टॅम्प) या अमली पदार्थाची विक्री करणारी टोळी डार्कवेबद्वारे अमली पदार्थ खरेदी करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 1 कोटी 14 लाखांचे स्टॅम्प जप्त केले होते. त्यामुळे पुण्यात डार्कनेटवर्कद्वारे नशेचा बाजार भरत असल्याचे पुढे आले आहे. रोहन दीपक गवई, सुशांत काशिनाथ गायकवाड, धीरज दीपक लालवाणी, दीपक लक्ष्मण गेहलोत, ओंकार रमेश पाटील या पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती.

फूड डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे विक्री

फूड डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे पुण्यातील कॉलेज तरुण-तरुणींना अमली पदार्थांची विक्री करणा-या चौघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या काही दिवसांपूर्वी (एक) अटक केली होती. त्यांच्याकडून 51 लाख 60 हजार रुपये किमतीचे एलएसडी स्टॅम्प (17 ग्रॅम वजनाचे 1 हजार 32 तुकडे) जप्त केले होते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी या टोळीने ही शक्कल लढवली होती. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधल्यानंतर डिलिव्हरी देण्यासाठी ते फूड अ‍ॅपद्वारे पार्सल पाठविण्याच्या बहाण्याने ऑर्डर बुक करत होते. समोरील व्यक्तीने ऑर्डर दिल्यानंतर डिलिव्हरी बॉयकडे पार्सल पॅक करून पाठवले जात होते. त्यामध्ये काय आहे हे डिलिव्हरी बॉयला माहीत नसते. मात्र, ही टोळी त्याचद्वारे अमली पदार्थाची विक्री करत होती. पोलिसांना त्याची चाहूल लागल्याने टोळीचा पर्दाफाश झाला.

 

japan : 72 ऋतूंचा देश जपान!

Sassoon Drug Csae : मेफेड्रोन उत्पादक भूषणला नेपाळ बॉर्डरवर ठोकल्या बेड्या

अंतराळवीर कॉफी कशी पितात?

Back to top button