japan : 72 ऋतूंचा देश जपान! | पुढारी

japan : 72 ऋतूंचा देश जपान!

टोकिया : जगभरात सर्वसाधारणपणे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असे तीन ऋतू असतात. मात्र, भौगोलिक परिस्थितीमुळे मोसमात देखील बदलाचे वारे वहात असतात. काही ठिकाणी उष्णतेचा कहर आढळून येतो तर काही ठिकाणी प्रचंड थंडी पडते. आपल्याकडे वसंत, ग्रीष्म, वर्षा,शरद, हेमंत, शिशिर असे 6 उपऋतू येतात. चिनी कॅलेंडरमध्ये 24 उपऋतू आहेत. मात्र, जगाच्या पटलावर एक देश असाही आहे, ज्यात एक-दोन नव्हे तर 72 मोसमांचा अनोखा नजारा पाहायला मिळतो. तो देश म्हणजे जपान.

जपानी कॅलेंडर 72 मोसमात विभागले गेले आहे, असे म्हटले तर आश्चर्याचा धक्का बसेल. पण, वस्तुस्थिती अशीच आहे. आता अन्य देशांप्रमाणे जपानमध्येही चारच ऋतू आहेत, पण सर्व ऋतू 6 भागांमध्ये विभागलेेले आहेत, जे 24 सेकी बनवतात. जपानी सूक्ष्म ऋतू कोरियामधून सहाव्या शतकाच्या मध्यात कोरियातून स्वीकारले गेले होते.

यातील प्रत्येक सूक्ष्म ऋतूला दिलेली नावे उत्तर चीनमधील हवामान आणि नैसर्गिक बदलांवरून घेतली गेली आहेत. जपानमध्ये 4 मोसमच आहेत, पण ते 6 भागांत विभागले गेले आहेत आणि त्यापासून उपऋतू तयार होतात. हे सर्व उपऋतू प्रत्येकी 15 दिवसांचे असतात. हा कालावधी प्राचीन चिनी ल्युनीसोलर कॅलेंडरवर आधारित आहे. हे वेळ मोजण्याचे असे परिमाण आहे, जे चंद्राच्या स्थितीवर आणि पृथ्वीने सूर्याची परिक्रमा करण्यावर आधारित आहे.

1685 मध्ये शिबुकावा शुनकाईने याची नावे निश्चित करण्याबरोबर त्यांचा अधिक तपशील सुनिश्चित करण्याचा विडा उचलला. त्याने तयार केलेले कॅलेंडर 1873 पर्यंत वापरात राहिले. त्यानंतर मीजी सरकारने आधुनिकतेच्या शोधात पारंपरिक कॅलेंडर प्रणाली संपुष्टात आणली आणि पश्चिम सौर आधारित ग्रेगोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला.

अर्थात, जपानमध्ये आजही तेथील शेतकरी, मच्छीमारांसारखे लोक जुन्या कॅलेंडरलाच मानतात.

Back to top button