Sassoon Drug Csae : मेफेड्रोन उत्पादक भूषणला नेपाळ बॉर्डरवर ठोकल्या बेड्या | पुढारी

Sassoon Drug Csae : मेफेड्रोन उत्पादक भूषणला नेपाळ बॉर्डरवर ठोकल्या बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग तस्कर ललित पाटील याचा भाऊ भूषण अनिल पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलकवडे (दोघे रा. नाशिक) या दोघांना पोलिसांनी नेपाळ सीमेजवळील बाराबंकी-गोरखपूर रोड येथून ताब्यात घेतले. पुणे पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने मंगळवारी ही संयुक्त कारवाई केली. मात्र, ललित पाटील अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

भूषण आणि अभिषेक हे दोघे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यापूर्वीच दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. दोघांना रात्री उशिरा पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू होती. याप्रकरणी, बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यापूर्वी या प्रकरणात सुभाष जानकी मंडल (वय 29, रा, देहू रोड, मूळ रा. झारखंड), ससून रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार रौफ रहीम शेख (वय 19, रा. ताडीवाला रस्ता), आणि ललितला गाडीतून रावेतपर्यंत सोडणारा चालक दत्ता डोके या तिघांना अटक करण्यात आली आहे.

पाटीलला रुग्णालयात दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन देण्यासाठी आलेल्या मंडल आणि शेख यांना गुन्हे शाखेने गेल्या शनिवारी (30 सप्टेंबर) अटक केली होती. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेणारा ललित पाटील बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन सोमवारी रात्री पसार झाला. ललित फरार झाल्याने पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागले होते. ललित पाटील फरार झाल्यापासून पुणे पोलिसांची दहा पथके त्याच्या मागावर होती. पुढे भूषण पाटील हादेखील त्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आले.

भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक या दोघांचा शोध पोलिस घेत होते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे केलेल्या तपासात भूषण आणि अभिषेक हे दोघे उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यांनी याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांना कळविले. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. या सर्व घटनेवर पोलिस आयुक्त रितेशकुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे स्वतः लक्ष ठेवून होते. दोन्ही आरोपी मिळाल्याचे समजल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त सुनिल तांबे आणि त्यांचे पथक उत्तर प्रदेशात गेले. रात्री उशिरा दोघांना पुण्यात आणण्यात आले आहे.

ड्रगचे पैसे घेणार होता भूषण..

गुन्हे शाखेच्या पथकाने ससून ड्रग रॅकेटप्रकरणी कारवाई केली तेव्हा भूषण पाटील हादेखील पुण्यात होता. त्यानेच ड्रग ससून रुग्णालयापर्यंत पोहोच केल्याची पोलिसांची माहिती आहे. एवढेच नाही तर त्याने ललित हा ससून रुग्णालात वापरत असलेल्या आयफोनमधील सीमकार्डदेखील त्यानेच आणून दिले होते. भूषण आणि अभिषेक हे दोघे आरोपी ललितच्या सतत संपर्कात होते. विक्री होणार्‍या ड्रग्जचे पैसे भूषण याच्याकडे जमा होत असावेत. त्या दिवशीच्या डीलचे पैसे त्याच्याकडेच जाणार होते. मात्र, पोलिसांची कारवाई झाल्याचे समजताच त्यानेसुद्धा पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी भूषण आणि अभिषेक या दोघांना ललित पाटीलच्या गुन्ह्यात आरोपी केले.

बंडगार्डन पोलिस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल असून, काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये आरोपी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे हे दोघे फरार होते.

– अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त गुन्हे, पुणे शहर

भूषण पाटीलच मास्टरमाइंड

भूषण पाटील हा ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख मास्टरमाइंड आहे. भूषण हा केमिकल इंजिनीअर असून, तोच ड्रग्ज तयार करत होता. त्यासाठी त्याने प्रशिक्षण घेतल्याची माहिती आहे. ड्रग्ज तयार करण्याचे काम भूषण करत होता, तर ते विकण्याचे काम ललित पाटील हा करत होता. तसेच अभिषेक बलकवडे हा भूषणसोबत आर्थिक बाबी पाहत होता. भूषण पाटील याच्यावर पुण्यासह नाशिक आणि मुंबईतील साकीनाका येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा

अंतराळवीर कॉफी कशी पितात?

Assembly Elections : पाच राज्यांचे 16 कोटी लोक ठरविणार दिशा

दोन बेटांच्या प्रमाणवेळेत 21 तासांचा फरक!

Back to top button