स्फोट अवैध धंद्यांचा; चिरीमिरीसाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ | पुढारी

स्फोट अवैध धंद्यांचा; चिरीमिरीसाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ

संतोष शिंदे

पिंपरी(पुणे) : टँकरमधून अवैधरित्या गॅस काढून घेताना सिलिंडरचे एकापाठोपाठ एक मोठे स्फोट झाले. या स्फोटाची भीषणता इतकी होती की, सुमारे एक किलोमीटर परिसरातील सोसायट्यांना हादरा बसला. मागील काही दिवसांपासून स्थानिक पोलिसांच्या कृपाशीर्वादाने हा गोरखधंदा सुरू असल्याचे बोलले जात आहे. चिरीमिरीसाठी पोलिस सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

गॅसचोरी बरोबरच, स्टील, ऑईल, डिझेल चोरी, सिमेंट भेसळ असे अनेक रॅकेट शहर परिसरात आजही सुरू आहेत. पोलिसांचेही हात ओले होत असल्याने याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, रविवारी (दि. 8) रात्री झालेल्या स्फोटामुळे खात्यातील उच्चपदस्थ मंडळी खडबडून जागी झाली आहेत. एकंदरीतच ताथवडे येथे घडलेल्या या घटनेमुळे अवैध धंद्यांचादेखील ‘स्फोट’ झाल्याची चर्चा आहे.

चोरीच्या ऑईलची विक्री

महामार्गावरून वेगवेगळ्या प्रकारच्या ऑईलचे टँकर धावत असतात. महामार्गालगत निर्जन ठिकाणी या टँकरमधून ऑईल काढून घेतले जाते. टँकरचालकदेखील या रॅकेटमध्ये सहभागी असतात. चोरून काढलेल्या या ऑईलची शहरभर विक्री केली जाते. या रॅकेटमध्ये असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. तसेच, सिमेंटच्या पोत्यांमध्येदेखील भेसळ करून त्याची विक्री करण्याचे उद्योग काही मंडळी करीत आहेत.

स्टील चोरीचा गोरखधंदा

शहरात स्टील चोरीचेदेखील मोठे रॅकेट आहे. या धंद्यामध्ये काही मोठे भांडवलदार उतरले आहेत. मोठ्या बांधकाम साईटवर स्टील (लोखंडी सळई) घेऊन जाणार्‍या वाहनांमधून काही टन स्टील उतरवले जाते. त्यानंतर वजनकाटा ‘मॅनेज’ करून वजनाची खोटी पावती घेतली जाते. बांधकामसाईटवर असलेल्या सुपरवायझरला पावती दाखवली जाते. सुपरवायझरने हरकत घेऊन पुन्हा वजन करण्याचा आग्रह केल्यास त्याला चिरीमिरी देऊन गप्प केले जाते. त्यानंतर चोरलेले स्टील अल्पदारात छोट्या व्यावसायिकांना विक्रीसाठी दिले जाते. याचा थेट फटका मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना बसत आहे.

पेट्रोल/डिझेल चोरीचे रॅकेट

मुंबई-बंगळुरू महामार्गावरून गॅससह पेट्रोल/डिझेलची वाहतूक केली जाते. स्थानिक पोलिसांना हाताशी धरून काहीजण टँकरमधून पेट्रोल/डिझेल काढून घेतात. मोठ्या बांधकाम साईटवर असलेल्या जेसीबी आणि अवजड वाहनचालकांना या पेट्रोल/ डिझेलची कमी दरात विक्री केली जाते. दररोज रात्री हा गोरखधंदा सुरू असतो.

…तर मोठी हानी झाली असती

आग लागून सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर जवळच असलेल्या टेम्पोच्या चिंधड्या झाल्या. सुदैवाने मोठ्या कॅप्सूल टँकरने पेट घेतला नाही. मोठा टँकर पेटून स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.
वेश्याव्यवसाय करणार्‍यांची चुुळबूळ
मागील काळात शहर परिसरातील वेश्या व्यवसायाला पूर्णपणे लगाम लावण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र, नुकतेच काही महिन्यांपासून पुन्हा एकदा वेश्याव्यवसाय करणार्‍यांची चुळबूळ सुरू झाली आहे. मोबाईलवर फोटो पाठवून लॉजवर तरुणी पाठवल्या जात आहेत. स्थानिक पोलिसांपुरते मर्यादित असलेल्या या रॅकेटकडेदेखील वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

सहा जण निलंबित

गॅस स्फोटप्रकरणी दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि चार पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. सहपोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सोमवारी रात्री याबाबतचे आदेश दिले. दोन अधिकार्‍यांमध्ये वाकड आणि रावेत पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एका अधिकार्‍याचा समावेश आहे.

पोलिस आयुंक्ताच्या आदेशान्वये हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, वेळोवेळी अवैध धंद्यांवर कारवाई केली जाते. या व्यतिरिक्त कोठे अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात जाऊन माहिती द्यावी.

– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

हेही वाचा

Shevai Kheer : नवरात्रौत्सवाच्या उपवासासाठी तुपातील स्पेशल खीर

भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी एकनाथ खडसे यांना झटका

Supriya Sule : मुंडे, महाजनांच्या मुलींचे भाजपकडून हाल : खासदार सुप्रिया सुळे

Back to top button