नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात साडेपाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या एका नराधमास सोमवारी (दि.३) जिल्हा सत्र न्यायाधीश एस.आर.पडवळ यांनी तिहेरी फाशीची शिक्षा सुनावली. तिहेरी फाशीची शिक्षा असे हे पहिलेच प्रकरण असल्याची माहिती पोलीस व विधी वर्तुळात मिळाली. संजय देव पुरी (३२, रा. लिंगा , कळमेश्वर) असे या आरोपीचे नाव आहे.
कळमेश्वर हददीतील लिंगा शिवार येथील साडेपाच वर्षीय बालिका ६ डिसेंबर २0१९ रोजी घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या पालकांनी ७ डिसेंबर रोजी कळमेश्वर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. ८ डिसेंबर रोजी बालिकेचा मृतदेह संजय भारती यांच्या शेतात आढळून आला. ही बालिका आजीच्या घरी झोपायला जात असल्याने व ती आजीकडे गेली असावी, या अंदाजातून फिर्यादीने अधिक विचारपूस केली नव्हती. ७ डिसेंबर रोजी बालिका घरी आली नसल्याने फिर्यादी आईने तिचा गावात शोध घेतला. तिला अज्ञात आरोपीने आमिष देवून पळवून नेले. या फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ४ फेब्रुवारी २०२० रोजी न्यायालयात आरोपपपत्र दाखल केले. प्रमोद कडबे यांनी न्यायालयाला सहकार्य केले. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील प्रशांत सत्यनाथन यांनी बाजू मांडली.
आरोपीने तिला शेंगाचे आमिष देवून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या नराधमाने तिच्या कपाळावर दगड मारून तिची हत्या केली. याप्रकरणी न्यायालयाने एकूण २७ साक्षीदार तपासले. याचा तपास सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सरंबळकर यांनी केला.
सत्र न्यायाधीश पडवळ यांनी आरोपीला भादंविच्या कलम ३0२ मध्ये फाशी , १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावास, भादंविच्या ३७६ (ब) मध्ये फाशी तसेच पोक्सो कलम (६) मध्ये फाशी तसेच भादंविच्या कलम ३६३ मध्ये ७ वर्षे सश्रम कारावास, दंड व दंड न भरल्यास सहा महिने कारावास, भादंविच्या कलम ३७६ (२) मध्ये जन्मठेप आणि पोक्सो सेक्शन ४ मध्ये दहा हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने सश्रम कारावास तसेच पोक्सो सेक्शन १० मध्ये सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपए दंड, अशी शिक्षा सत्र न्यायालयाने या आरोपीला ठोठावली आहे.