दौंडमधील साखर कारखानदारीला बसणार फटका | पुढारी

दौंडमधील साखर कारखानदारीला बसणार फटका

रामदास डोंबे

खोर : दौंड तालुक्यात या वर्षी 15 हजार हेक्टर ऊस लागवड क्षेत्रापैकी 14 हजार 810 हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आल्याने 190 हेक्टर ऊस लागवडीला फटका बसला गेला आहे. त्यातच तालुक्यातील गुर्‍हाळे हे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना चांगला बाजारभाव देत असल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी कारखाना हंगाम सुरू होण्याच्या आधीच गुर्‍हाळाला ऊस घालण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, तालुक्यातील साखर कारखान्यांपुढे गळीत हंगामाला गुर्‍हाळांचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दौंड तालुक्यात भीमा पाटस सहकारी कारखान्यासह अनुराज शुगर (यवत), श्रीनाथ म्हस्कोबा (पाटेठाण) आणि दौंड शुगर (आलेगाव) असे चार साखर कारखाने आहेत. गेल्या वर्षी भीमा पाटस कारखाना सुरू झाला आणि गुर्‍हाळाबरोबरच इतर साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला याचा फटका बसला गेला. मात्र, या वर्षी गुर्‍हाळाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 2 हजार 900 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत बाजारभाव दिला आहे. परिणामी, दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरीवर्ग पुन्हा गुर्‍हाळाकडे वाटचाल करू लागला आहे. दौंड तालुक्यातील गुर्‍हाळांची दुकानदारी बंद करायची असेल तर साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकर्‍यांना गुर्‍हाळांच्या बरोबरीत अपेक्षित बाजारभाव देणे गरजेचे आहे. गुर्‍हाळे व साखर कारखाने यांच्या भांडणात दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरीवर्गाला याचा फायदा होत आहे. गुर्‍हाळाच्या तोडीत जर साखर कारखान्यांनी बाजारभाव दिला, तर शेतकरीवर्ग साखर कारखान्यांना ऊस घालेल व कारखान्याच्या गळीत हंगामांचे आपले उद्दिष्ट पूर्ण करेल, हे नक्की.

तालुक्यात मागील साडेतीन महिन्यांपासून पावसाने ताण दिल्यामुळे ऊसपिकाला पाणी कमी पडायला लागले. त्या कारणाने शेतकरी बांधवांना गुर्‍हाळघरांना ऊस देणे बंधनकारक झाले. तालुक्यामध्ये साधारण 450 ते 500 गुर्‍हाळ आहेत. 24 तासांत 15 ते 25 टनांपर्यंत गुर्‍हाळे ऊस गाळप करीत असतात. त्याचा परिणाम कारखान्याला ऊस उपलब्ध होण्यास अडचणीचा विषय ठरणार आहे. कारखान्याने जर 3 हजार 200 ते 3 हजार 300 रुपयांपर्यंत बाजारभाव दिला, तर गुर्‍हाळाला फटका बसू शकतो.
                                        – महेश रूपनवर, तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा

Back to top button