Pune News : खेडमध्ये रिंगरोडसाठी हेक्टरी 6 कोटींचा मोबदला | पुढारी

Pune News : खेडमध्ये रिंगरोडसाठी हेक्टरी 6 कोटींचा मोबदला

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : पुणे जिल्ह्यात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोडसाठी सध्या जमीन भूसंपादन करण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील 12 गावांसाठी दर निश्चित झाले. यात सर्वाधिक चिंबळी गावात काही गटांसाठी हेक्टरी तब्बल 6 कोटी 11 लाख रुपयांचे दर निश्चित झाले आहेत. यामध्ये शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत शेतकर्‍यांनी संमती दिली, तर वाढीव 25 टक्के रक्कम देण्यात येणार आहे. या रिंगरोडचे पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग असून, पूर्व रिंगरोडसाठी मावळातील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. पश्चिम रिंगरोडसाठी सध्या मोठ्या प्रमाणात जागा ताब्यात घेण्यात आली आहे. खेड तालुक्यात मागील काही वर्षांत त्या भागात झालेले जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार व रेडीरेकनरच्या पाचपट अधिक मोबदला देण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने खेड तालुक्यातील 12 गावांत रिंगरोडसाठी भूसंपादन करताना दर निश्चित केले आहेत. त्यानुसार तालुक्यातील संबंधित शेतकर्‍यांना नोटीस देण्याचे काम सुरू झाले आहे. त्या भागातील जमिनीचे दर, रेडीरेकनरचे दर सर्व गोष्टींचा अभ्यास करून जिल्हास्तरीय समितीने हे दर निश्चित केले आहेत. शासनाने दिलेल्या मुदतीत संमतीपत्र दिले, तर अधिकची 25 टक्के रक्कम मोबदला म्हणून देण्यात येणार आहे. यामुळेच जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा.
                                                         – जोगेंद्र कट्यारे, खेड, प्रांताधिकारी

गावनिहाय वेगवेगळे दर
खेड तालुक्यात 12 गावांत 614 गटांमध्ये तब्बल 292 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यामध्ये खालुंब—े, निघोज, माई, कुरुळी, चिंबळी, केळगाव, चर्‍होली खुर्द, धानोरा, मरकळ, सोळू, गोलेगाव या 12 गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक गटासाठी त्या भागातील जमीन खरेदी-विक्रीचे मागील तीन वर्षांतील व्यवहार व रेडीरेकनरचे दर लक्षात घेऊन दर निश्चित करण्यात आले आहे. यात सर्वाधिक दर चिंबळी येथे हेक्टरी 6 कोटी 11 लाख, खालुंब—े 4 कोटी 34 लाख, चर्‍होली 4 कोटी 90 लाख रुपये मिळणार आहेत.

 

Back to top button