मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती, तर संघ समर्थक पोलीस अधिकार्याने झाडली होती. हे सत्य अॅड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. दरम्यान, वडेट्टीवार यांच्या आरोपाच्या अनुषंगाने भाजपने त्यांच्या विरोधात मुख्य निवडणूक आयोगाकडे रविवारी तक्रार नोेंदवली.
मी एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला असून याबाबत त्यांना (उज्ज्वल निकम यांना) काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी करावा.
-विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
मुंबईवर 2008 साली हल्ला झाला तेव्हापासून 2014 पर्यंत महाराष्ट्रात आणि देशात काँग्रेसचे सरकार होते. आज विरोधी पक्षनेते असे वक्तव्य करत आहेत, ज्यामुळे याचा पाकिस्तानला फायदा होणार आहे. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीविजय वडेट्टीवार यांनी निराधार आरोप केले असून याबद्दल मला वाईट वाटतंय. यामुळे पाकिस्तान सरकारला फायदा होऊ शकतो. ते असे दावे कशाच्या आधारे करत आहेत हे मला माहीत नाही. राजकारणात गुंतून तुम्ही आमच्या देशाची प्रतिमा मलिन करत आहात याचे आश्चर्य वाटते. ज्यांना माझ्या उमेदवारीची भीती वाटते, ते अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत.
– अॅड. उज्ज्वल निकम, महायुतीचे मुंबई उत्तर मध्यचे उमेदवारवडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. निवडणुकीत मते मिळवण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार?
– चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष