Pune news : ‘सोमेश्वर’च्या स्वीकृत संचालकपदी कोणाला संधी? | पुढारी

Pune news : ‘सोमेश्वर’च्या स्वीकृत संचालकपदी कोणाला संधी?

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा :  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या दोन स्वीकृत संचालकांची मुदत 28 जानेवारीला 2023 ला संपली असून, या जागेवर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. नुकताच माळेगाव कारखान्याच्या स्वीकृत संचालकाचा राजीनामा स्वीकारून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्याने दोन तरुण संचालकांना संधी ही दिली आहे. सोमेश्वरलाही स्वीकृतबाबत हालचालींना वेग आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

‘सोमेश्वर’च्या संचालकपदावरून पुरंदर आणि बारामती तालुक्याला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. या अगोदर तुषार माहुरकर (माहूर, ता. पुरंदर) आणि अजय कदम (ता. खंडाळा) यांची स्वीकृत संचालकपदावर वर्णी लागली होती. प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे एकाला संचालक पदावर काम कारण्याची संधी मिळणार होती व तसे अजित पवार यांनी जाहीरपणे सभेत सांगितलेही होते. मात्र, निवडणूक होऊन दोन वर्षे होऊनही इच्छुकांना संधी मिळाली नसल्याने निवड कधी होणार याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच माळेगावचा निर्णय नुकताच झाल्याने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

तरुणांमध्ये व शेतकरीवर्गात सक्रिय असणाऱ्यांना अजित पवार संधी देतील, असेही सभासदांमध्ये बोलले जात आहे. संचालक मंडळाच्या ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी संचालकपदाची मागणी केली होती. त्या वेळी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता संधी मिळण्याची आशा आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हेच अंतिम निर्णय घेणार आहेत. सर्वांनाच उमेदवारी शक्य नसल्याचे सांगत अजित पवार यांनी चार तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळात जुन्या-नव्या व तरुणांचा मेळ घालत सोमेश्वरवर एकहाती सत्ता मिळवली होती. ऐनवेळी अजित पवार धक्कातंत्र वापरण्याची दाट शक्यता आहे. नवख्या तरुणांना संधी मिळणार की जुन्या जाणकारांचा मेळ पवार घालणार, याकडे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button