पिंपरी : मेट्रो बेहिशोबी ! उभारणी खर्च अन् उत्पन्नाचा बसेना मेळ | पुढारी

पिंपरी : मेट्रो बेहिशोबी ! उभारणी खर्च अन् उत्पन्नाचा बसेना मेळ

पिंपरी : घाईघाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच प्रकल्पाचे दोन वेळा उद्घाटन करण्यात आले. मेट्रो सुरू झाल्यापासून किती उत्पन्न मिळाले, याचा ताळमेळ अद्याप मांडता आलेला नाही. मेट्रो धावत असतानाही काही ठिकाणी कामे सुरूच आहेत. संपूर्ण मार्ग सुरू होईपर्यंत मेट्रो तोट्यातच चालणार, असे महामेट्रोचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे मेट्रो उभारणीचा खर्च व प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न याचा मेळ अद्याप बसला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मेट्रो पिंपरी ते फुगेवाडी अशी 1 मार्च 2022 ला सुरू झाली. हे अंतर केवळ 5.9 किलोमीटर इतके असल्याने मेट्रो प्रवाशांविनाच पळत होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षांनी मेट्रो मार्गाचा विस्तार करण्यात आला. एक ऑगस्ट 2023 ला फुगेवाडीच्या पुढे मेट्रो रूबी हॉल व वनाजपर्यंत पोहोचली. या दोन्ही मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मागील प्रतिसादाच्या तुलनेत पिंपरी ते रूबी हॉल आणि वनाजपर्यंतच्या मेट्रो प्रवाशांला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी, नाशिक फाटा, कासारवाडी, दापोडी, बोपोडी व खडकी स्टेशनची कामे सुरूच आहेत. पिंपरी-चिंचवड व पुणे शहर जोडले गेल्याने मेट्रो मार्गावर घर, कार्यालय, कंपनी तसेच, इतर कामे असलेले नागरिक व विद्यार्थी मेट्रोने नियमितपणे प्रवास करीत आहेत.

तर, सुटीच्या दिवशी नागरिक सहकुटुंब मेट्रोचा आनंद घेत असल्याने मेट्रो नागरिकांनी अक्षरश: भरून वाहत आहे.
प्रवासी संख्या वाढली असूनही ती पुरेशी नाही. पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या संपूर्ण मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर नागरिकांचा प्रतिसाद आणखी वाढेल. त्यामुळे महामेट्रोला चांगले उत्पन्न मिळेल. त्यानंतर मेट्रो फायद्यात येईल, असा दावा अधिकारी करीत आहेत.

महामेट्रोचा मोठा खर्च
सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत मेट्रो धावत आहे. प्रत्येक 10 ते 15 मिनिटास मेट्रो ये-जा करते. मेट्रो संचालनासाठी स्टेशन मास्टर, सुरक्षारक्षक, सफाई कामगार, तिकीट कक्ष, तांत्रिक अभियंते, चालक, उद्घोषक व इतर कर्मचारी तैनात आहेत. मेट्रो धावण्यासाठी तसेच, स्टेशनवरील प्रकाश व्यवस्थेसाठी वीज वापरली जाते. शेकडो अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत आहेत. तसेच, विविध कार्यक्रमांचे आयोजन, जाहिरात आदींवरही खर्च केला जात आहे. त्यावर महामेट्रोचा मोठा खर्च होतो. पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या एकूण 33.10 किलोमीटर अंतराच्या प्रकल्पासाठी एकूण 11 हजार 522 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

तिकीट विक्रीतून महामेट्रोला उत्पन्न
मेट्रोतून प्रवास करणारे नागरिक तिकीट काढतात त्यातून महामेट्रोस उत्पन्न मिळते. तसेच, काही मेट्रो स्टेशनला कंपनी, संस्था व बँकांचे नाव देण्यात आले आहे. त्यातून उत्पन्न मिळते. मेट्रोच्या आतमध्ये, स्टेशन तसेच, स्टेशनच्या भोवती आणि पिलरच्या आजूबाजूस जाहिरातीचे फलक लावण्यात येणार आहेत. त्या जाहिरात उत्पन्नातून महामेट्रोला उत्पन्न मिळणार आहे. स्टेशनवर विविध स्टॉल भाडे तत्वावर देण्यात येणार आहेत. तसेच, वाढदिवस व विविध कार्यक्रमांसाठी मेट्रो स्टेशन व मेट्रो प्रवास करण्यास शुल्क भरून परवानगी दिली जात आहे. अशा विविध प्रकारे उत्पन्न वाढीवर महामेट्रोकडून भर देण्यात येत आहे.

संपूर्ण मार्गावर मेट्रो धावण्यास सुरू झाल्यानंतर उत्पन्न वाढणार

जसेजसे मार्ग पूर्ण होतात तसे मेट्रो नागरिकांसाठी खुली केली जात आहे. टप्पा एक व टप्पा दोनमधील स्वारगेट आणि रामवाडीपर्यंत मेट्रो मार्गिका व स्टेशनचे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर तेथेपर्यंतचा मार्ग नागरिकांसाठी खुला केला जाईल. पिंपरी ते स्वारगेट मार्गावर पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचा प्रतिसाद आखणी वाढणार आहे.

बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट भागांत अनेक शासकीय व सरकारी कार्यालये तसेच, शैक्षणिक संस्था आणि बाजारपेठ असल्याने मेट्रोतून नियमितपणे प्रवास करण्यासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे. नागरिकांना अधिकाधिक चांगली प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यावर महामेट्रोचा भर आहे. दोन्ही टप्प्यातील संपूर्ण मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर मेट्रोच्या उत्पन्नात भर पडणार आहे, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

Back to top button