वयाच्या 14 व्या वर्षी जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्याने दिले सहा जणांना जीवनदान ! | पुढारी

वयाच्या 14 व्या वर्षी जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्याने दिले सहा जणांना जीवनदान !

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  शाहूनगर येथील अपघातात जखमी झालेल्या 14 वर्षीय अक्षत लोहाडे या मुलावर उपचार सुरू असताना त्याला ब्रेनडेड (मेंदू मृत) घोषित करण्यात आले. त्यामुळे खचून न जाता त्याच्या आई-वडिलांनी मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सहा जणांना नवजीवन मिळाले आहे. शाहूनगर येथे अक्षत लोहाडे (वय 14) या मुलाला 25 ऑगस्टला अपघात झाला होता. गंभीर जखमी झालेल्या अक्षतला सुरुवातीला इंद्रायणीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याला 28 ऑगस्टला पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात हलविण्यात आले.

येथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्याचा जीव वाचविण्यात अपयश आले. 2 सप्टेंबरला त्याला मेंदू मृत ( ब्रेनडेड ) म्हणून घोषित करण्यात आले. ब्रेनडेड म्हणून घोषित केलेल्या अक्षतच्या अवयव दानासाठी त्याच्या पालकांची त्याच दिवशी संमती मिळाली. त्यानंतर 3 तारखेला अवयव दान करण्यात आले. 1 हृदय, 2 किडनी, 1 यकृत आणि 2 नेत्रपटल दान करण्यात आले. त्यातून सहा जणांना नवजीवन मिळाले. अक्षतचे फुफ्फुस अपघातामुळे खराब झाले होते. तसेच, त्याचे स्वादुपिंड (पॅनक्रिया) वापरात आले नाही, अशी माहिती रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण समन्वयिका यांनी दैनिक पुढारीला दिली.

ब्रेनडेड झालेल्या अक्षतच्या अवयव दानाबाबत मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. अमित पांडे यांनी त्याचे आई-वडील सुवर्णा व सचिन यांचे समुपदेशन केले. त्यानंतर पालकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे सहा जणांना नवजीवन मिळाले आहे.

अक्षत लोहाडे याचे ब्रेनडेड झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांचे अवयव दानासाठी समुपदेशन केले. त्यानंतर त्याच्या आईवडिलांच्या संमतीने त्याचे अवयव दान करण्यात आले.
                                                 – डॉ. अमित पांडे, मेंदू विकार तज्ज्ञ.

अक्षतचे अवयव दान करून लोहाडे कुटुंबीयांनी समाजाला एक चांगला संदेश दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काही जणांना नवजीवन मिळाले आहे.
                                                   – जितेंद्र छाबडा, अक्षतचे नातेवाईक.

बहिणीने बांधली शेवटची राखी
रक्षाबंधनाच्या तोंडावर लाडक्या भावावर इंद्रायणीनगर येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना अक्षतची बहीण विधी लोहाडे हिने राखी बांधली. भावासोबतचा हे तिचे शेवटचे रक्षाबंधन ठरेल, अशी कल्पनाही तिने केली नव्हती.

हेही वाचा : 

G 20 Dinner : निमंत्रण पत्रिकेवर President of India ऐवजी लिहिले President of Bharat; वाचा सविस्तर

निकषात पुणे जिल्ह्यातील दुष्काळ बसेना !

Back to top button