निकषात पुणे जिल्ह्यातील दुष्काळ बसेना ! | पुढारी

निकषात पुणे जिल्ह्यातील दुष्काळ बसेना !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, चारा आणि पाणीटंचाई तीव्र होण्याची भीती आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले. मात्र, चारा डेपो सुरू करण्याच्या निकषात बसत नसल्याचे कारण सांगून हे प्रस्ताव फेटाळण्याची शक्यता प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात 50 टक्क्यांपैकी पाऊस आणि 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणार्‍या गावांमध्येच टंचाई निवारण उपाययोजना म्हणजेच दुष्काळी उपाययोजना करण्यासाठीची तरतूद शासनाच्या निकषांमध्ये आहे. पावसाचा आणखी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे, तर दुसरीकडे 15 सप्टेंबरनंतर खरीप पिकांची नजर आणेवारीवर येते, तोपर्यंत चारा डेपोचे कुठलेही प्रस्ताव शासन निकषाप्रमाणे मंजूर करता येत नाहीत, असे महसूल विभागातील अधिकारी सांगितले.

जुन्नर तालुक्यातील सहा गावे आणि आंबेगाव तालुक्यातील चार गावांसाठी चारा डेपो मागणीचे प्रस्ताव तहसीलदारमार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आले. ते प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आले; परंतु दुष्काळी उपाययोजनांच्या निकषांमध्ये चारा डेपो सुरू करावयाचा झाल्यास शासनाने घालून दिलेल्या निकषाची पूर्तता होणे आवश्यक आहे. सध्याची स्थिती पाहाता, ते शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

शासनाने चारा डेपो सुरू करण्याचा निर्णय घेण्यास विलंब केला जात असून, धोरण आणि निकष या आधारे चारा डेपो नाकारले जाण्याची अधिक शक्यता आहे. आठवड्यांपूर्वी चारा डेपो सुरू करण्याची घोषणा राज्यातील एका मंत्र्यांनी केली. मात्र, साधी मंजुरीदेखील मिळालेली नाही. पावसाळ्याचे तीन महिने संपले तरी जिल्ह्यात 44 टँकरने एक लाखापेक्षा जास्त लोकांना पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता अजूनही प्रशासनाच्या लक्षात येत नसल्याचे दिसून येत आहे.

चारा छावण्या होणार नाहीत..
दुष्काळात जनावरांना एकत्र आणून चारा छावणी उभारली जाते. त्याठिकाणी त्यांना चारा, पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र, सध्या पुणे जिल्ह्यासह राज्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आहे. लम्पी हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे चारा छावणीला परवानगी दिली जाणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

शासनाकडून काहीच सूचना नाहीत…
सध्यस्थितीविषयी आढावा बैठक घेतल्या जात आहेत. त्यात 15 सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करा, त्यानंतर काही स्थिती असेल, हे पाहूल निर्णय घेतले जातील. तोपर्यंत ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता आहे, त्याठिकाणी तात्काळ टँकर सुरू करा, चारा डेपो सुरू करण्यासंदर्भात नंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : 

महावितरणचा ढिसाळपणा बेतला त्याच्या जिवावर ; तरुणाचा मृत्यू

पुणे : कमला नेहरू रुग्णालयात महिला डॉक्टरवर अरेरावी

Back to top button