दहीहंडीवर राजकीय थर; माजी नगरसेवकांचा बक्षिसांसाठी आखडता हात | पुढारी

दहीहंडीवर राजकीय थर; माजी नगरसेवकांचा बक्षिसांसाठी आखडता हात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आगामी महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शहर व उपनगरांमध्ये सर्वपक्षीय इच्छुकांनी दहीहंडी आयोजनामध्ये सर्वाधिक पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळते. असे असले तरी निवडणूक नेमकी केव्हा होणार? याचा कसलाही अंदाज नसल्याने माजी नगरसेवकांनी मात्र यंदा खर्चाबाबतीत आखडता हात घेतला आहे. महापालिकेची निवडणूक पुन:पुन्हा पुढे जात आहे. ही निवडणूक केव्हा होईल? हे कोणीही सांगू शकत नाही. विविध सण व उत्सवांमध्ये इच्छुकांकडून मतदार सांभाळण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी सढळ हाताने खर्च केला जातो. असेच काहीसे चित्र दहीहंडी उत्सवानिमित्त शहर व उपनगरांमध्ये पाहायला मिळत आहे.

सार्वजनिक दहीहंडी मंडळांनी जागोजागी सजविलेल्या दहीहंडी, डीजे, रंगीबेरंगी लाइट, स्टेज अशी जय्यत तयारी केली आहे. दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या दहीहंडी मंडळांमध्ये आणि बक्षिसाच्या रकमेमध्ये यंदा काही प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळते. दहीहंडीच्या आयोजनामध्ये महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्‍या आणि आजवर निवडून न आलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची संख्या मोठी दिसते. तर, माजी नगरसेवकांनी बक्षीस व आयोजनाच्या खर्चासाठी यंदा आखडता हात घेतल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले. यासंदर्भात काही माजी नगरसेवकांशी संवाद साधल्यानंतर निवडणुकीचा पत्ता नाही, मग खर्च किती वेळा करायचा? पैसा कुठून आणायचा? असा प्रतिप्रश्न केला.

फ्लेक्स लाखोंचे अन् प्रत्यक्ष बक्षीस हजारांचे!

राजकीय व्यक्तींनी आयोजित केलेल्या दहीहंडीसाठी 50 हजारांपासून थेट 22-25 लाखापर्यंत बक्षिसे ठेवल्याचे फ्लेक्स शहराच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. यासंदर्भात गोविंदा पथकांच्या पदाधिकार्‍यांशी बोलल्यानंतर फ्लेक्स मोठ्या रकमेचे लावले जातात. मात्र, प्रवेश घेतानाच आयोजकांकडून प्रत्यक्ष किती रक्कम दिली जाणार आहे, हे पथकांना सांगितले जाते. फ्लेक्स जरी लाखोंचे लावले जात असले, तरी हंडी फोडणार्‍या पथकाला 10 ते 25 हजारांचेच बक्षीस दिले जाते.

आमच्या मंडळाची दहीहंडी पाहण्यासाठी पुणेकर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही आमची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. रात्री 9.45 वाजता दहीहंडी फोडली जाणार आहे. मात्र, यंदा पाऊस कमी असल्याचे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आम्ही यंदाच्या खर्चात थोडी कपात करून बचत झालेले पैसे नागरिकांच्या मदतीसाठी राखून ठेवले जाणार आहेत.

– बाळासाहेब मारणे, हुतात्मा बाबू गेणू मंडळ ट्रस्ट, अध्यक्ष

सार्वजनिक दहीहंडी मंडळांकडून लाखो रुपये बक्षिसांचे फ्लेक्स लावले जातात. डीजे, लायटिंग आणि दोन-दोन, तीन-तीन अभिनेत्री, अभिनेते आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जाते. सर्व झगमगाट केवळ दाखविसाण्याठी आणि प्रसिद्धीसाठी केला जातो.

– विजय नाईक, गोविंदा, राधेकृष्ण ग्रुप

हेही वाचा

पुणेकरांनो हडपसर टर्मिनलवरून जा; पण दोन किमी चालायची तयारी ठेवा

संसद अधिवेशन गणेश चतुर्थीपासून नव्या वास्तूत

Manipur Violance : मणिपुरात सरकारी निर्बंधांमुळे पुन्हा हिंसाचार

Back to top button