पुणेकरांनो हडपसर टर्मिनलवरून जा; पण दोन किमी चालायची तयारी ठेवा | पुढारी

पुणेकरांनो हडपसर टर्मिनलवरून जा; पण दोन किमी चालायची तयारी ठेवा

पुणे : हडपसर टर्मिनलवर असलेली फीडर सेवा पीएमपी प्रशासनाने उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे बंद केली आहे. त्यामुळे हैदराबाद एक्स्प्रेसने पुण्यात येणार्‍या प्रवाशांचे फीडर सेवेसाठी प्रचंड हाल होत आहेत. त्यांना अवजड बॅगा घेऊन सुमारे दीड ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज दोनशेपेक्षा अधिक रेल्वे गाड्यांची ये-जा असते. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा अतिरिक्त लोड आला आहे. त्यामुळे रेल्वेकडून हडपसर टर्मिनल येथून काही गाड्या सुरू करण्यात आल्या.

मात्र, गेल्या महिनाभरापासून पीएमपी प्रशासनाने आपल्या फीडर सेवेसाठी दिलेल्या मीडी बस बंद केल्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहेत. या स्थानकावर रिक्षा सोडले, तर इतर कोणतेही वाहन नाही. बसच्या सुविधेमुळे प्रवाशांना मोठा फायदा होत होता. मात्र, परवडत नसल्याचे कारण देत पीएमपीने येथील सेवा बंद केली आहे.

पुणे-हैदराबाद एक्स्प्रेस गाडीच्या वेळेत बससेवा द्या!

सध्या हडपसर स्थानकावरून फक्त एकच रेल्वेगाडी सुटते आणि येते. यासह अनेक डेमू गाड्या आहेत. पुणे-हैदराबाद या एक्स्प्रेस गाडीचे नियोजन हडपसर येथून असते. ती सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी हडपसर टर्मिनल येथे येते आणि दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी हडपसरवरून हैदराबादकडे रवाना होते. या गाडीमध्ये 900 प्रवासी प्रवास करतात. मात्र, पीएमपीने गाडी बंद केल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे येथील सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे.

हडपसर टर्मिनल येथून सुटणार्‍या बसगाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद नाही. त्यामुळे येथे सेवा देणे आम्हाला परवडत नाही. मात्र, जर दररोज येथून 900 प्रवासी प्रवास करीत असतील, तर त्याची रेल्वेकडून लेखी माहिती घेऊन, बंद केलेली सेवा पुन्हा सुरू केली जाईल.

– नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

हैदराबाद एक्स्प्रेसने येणार्‍या प्रवाशांची संख्या 900 आहे. या प्रवाशांचे गेले महिनाभरापासून बस बंद असल्याने हाल होत आहेत. याबाबत पीएमपीएमएलच्या सीएमडी यांच्याशी बोललो आहे. त्यांनी याला सकारात्मकता दर्शविली असून, बससेवा सुरू करणार असल्याचे आम्हाला सांगितले आहे.

– डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय
वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे, पुणे विभाग

हेही वाचा

संसद अधिवेशन गणेश चतुर्थीपासून नव्या वास्तूत

Bharat Mandapam : भारत मंडपममध्ये होणार ‘जी-20’चा मुख्य कार्यक्रम

उमरगा : मराठा आरक्षणासाठी तलावात उडी घेऊन तरुणाने संपवले जीवन

Back to top button