Sport News : राज्य शालेय स्पर्धेतून ‘या’ तीन खेळांना ‘डच्चू’; क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचा निर्णय | पुढारी

Sport News : राज्य शालेय स्पर्धेतून 'या' तीन खेळांना ‘डच्चू’; क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचा निर्णय

सुनील जगताप

पुणे : राज्यातील एका खेळाच्या दोन – दोन संघटना अस्तित्वात आल्याने खेळाडूंची स्पर्धांमध्ये सहभागी होताना अडचण निर्माण होत आहे. त्यातच क्रीडा विभागाकडून किक बॉक्सिंग, कराटे आणि तायक्वांदो या खेळांची राज्यस्तरीय शालेय स्पर्धाच रद्द करण्यात आली आहे. संघटनांमधील वादामुळे खेळाडूंचे यामध्ये मोठे नुकसान होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने 2023-24 या वर्षातील राज्यस्तरीय शालेय स्पर्धांच्या आयोजनामध्ये किक बॉक्सिंग, कराटे आणि तायक्वांदो या खेळांच्या स्पर्धा न घेण्याबाबत निर्णय देण्यात आला आहे. त्याचा फटका या तीन ही खेळातील हजारो खेळाडूंना बसणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धा न खेळल्याने त्यांना राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागीच होता येणार नाही. या शालेय स्पर्धाच खेळल्या गेल्या नाही तर या खेळाडूंना नोकरीतील 5 टक्के आरक्षण, ग्रेस गुण आणि शिवछत्रपती पुरस्कार मिळण्यातील अडचणी वाढणार आहेत.
सध्याच्या दंगलीच्या, गोंधळाच्या आणि निव्वळ पोकळ घोषणांच्या किळसवाण्या राजकीय परिस्थितीत क्रीडा क्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. अनेक खेळाडू विविध मैदानावर सराव करताना दिसून येत आहेत. विविध क्रीडा प्रकारांच्या शालेय स्पर्धाही सुरु झालेल्या असताना क्रीडा विभागाकडून कराटे खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धाच रद्द झालेल्या आहेत. शासनाने याबाबत त्वरीत लक्ष घालून या स्पर्धा घ्याव्यात. अन्यथा खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि संघटनांच्या प्रतिनिधींसह तीव्र आंदोलन करु.
– लतेंद्र भिंगारे, अध्यक्ष, क्रीडा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
क्रीडा विभागाने तीन खेळांची राज्यस्तरीय शालेय स्पर्धा रद्द करणे चुकीचे आहे. खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धाच खेळले नाही तर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके कसे मिळवतील? याबाबत एमओएकडून नक्कीच क्रीडा विभागाची चर्चा करुन निवेदन देण्यात येईल. या तीन ही खेळांच्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धा होणे आवश्यक आहे.
– नामदेव शिरगावकर, 
महासचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन
आत्ताच्या परिस्थितीत क्रीडा विभागाकडून किक बॉक्सिंग, कराटे आणि तायक्वांदो या तीन खेळांच्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. एका खेळाच्या दोन संघटना अस्तित्वात असून त्यांच्यामध्ये वाद सुरु आहेत. या वादामुळे खेळाडूंना 5 टक्के नोकरी आरक्षण आणि ग्रेस गुण देताना अडचणी निर्माण होत आहेत. हे वाद मिटल्यास नक्कीच स्पर्धा घेण्यात येतील.
– डॉ. सुहास दिवसे,
  आयुक्त, क्रीडा व 
युवक सेवा संचालनालय
हेही वाचा

Back to top button