नाशिक : पेठरोडच्या धुळीसाठी पुन्हा सात लाखांचा बार | पुढारी

नाशिक : पेठरोडच्या धुळीसाठी पुन्हा सात लाखांचा बार

नाशिक : पुढारी वृृत्तसेवा

पेठरोडवरील हाटेल राऊ ते जकात नाक्यापर्यंतच्या चार किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर उडणारी धूळ खाली बसविण्यासाठी पुन्हा एकदा सात लाखांचा बार उडविण्याची तयारी बांधकाम विभागाने केली आहे. यापूर्वी सात लाख रुपयांचे पाणी मारून देयके काढण्यात आली होती. परंतु आता नागरिकांच्या मागणीचा आधार घेऊन पुन्हा महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

नाशिक महापालिका हद्दीतील पंचवटी विभागातील पेठरोड हा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल राऊ ते जकात नाक्या पर्यंतच्या चार किलोमीटरचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने रस्त्यावरील खड्डे महापालिकेच्या वतीन भरण्यात आले. परंतु गुजरातकडून येणारी व जाणारी जड वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने या रहदारीमळे मोठ्या प्रमाणात धूळ उडते. यासंदर्भात नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात तक्रार आहे. त्यामुळे टँकरने पाणी मारून धूळ खाली बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवसभरातून जवळपास चार टँकरद्वारे रस्त्यावर पाणी मारले जात आहे. पाणी मारण्याची सात लाख रुपयांची देयके यापूर्वी काढण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा नागरिकांच्या मागणीचा आधार घेऊन सहा लाख ९० हजार रुपयांची देयके अदा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महासभा व स्थायी समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दरम्यान धुळीसंदर्भात नागरिकांची वर्षभरापूर्वी तक्रार होती. त्यानंतर मात्र रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने नागरिकांच्या तक्रारीचा सूर कमी झाला. मध्यंतरीच्या काळात पावसामुळे धूळ उडण्याचादेखील संबंध नसताना बांधकाम विभागाने पुन्हा एकदा पाणी फवारणीची देयके काढण्यासाठी सदर केलेला प्रस्ताव वादात सापडणार आहे. नागरिकांच्या मागणीनुसार पाणी फवारणीचे काम झाले असून त्यानुसार देयके देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

Back to top button