पुण्यात विसर्जन मिरवणुकीला पथकांच्या तीनच रांगा; फक्त 50 ढोल | पुढारी

पुण्यात विसर्जन मिरवणुकीला पथकांच्या तीनच रांगा; फक्त 50 ढोल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विसर्जन मिरवणुकीला लागणारा विलंब आणि नागरिकांचे होणारे हाल टाळण्यासाठी यंदाच्या वर्षी मिरवणूक मार्गांवर ढोल-ताशा पथके तीनच रांगांमध्ये जाणार असून, पथकांमध्ये 50 ढोलांची संख्या मर्यादित करण्यात आल्याचा निर्णय ढोल-ताशा महासंघाने घेतला आहे. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महासंघातील पदाधिकार्‍यांनी विसर्जन मिरवणुकीबाबतची भूमिका मांडली.
गणेश विसर्जन मिरवणुकीला लागणारा विलंब, ढोल-ताशा पथकांची वाढलेली संख्या हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत विसर्जन मिरवणुकीबाबतची भूमिका महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी मांडली. पत्रकार परिषदेला महासंघाचे विलास शिगवण, संजय सातपुते, प्रकाश राऊत, अ‍ॅड. शिरीष थिटे, अनुप साठ्ये आदी उपस्थित होते. यंदाच्या गणेशोत्सवात 170 ढोलताशा पथकातील सुमारे 22 हजार वादक शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होणार आहेत.
मिरवणुकीत पोलिस, प्रशासन आणि मंडळांना संपूर्ण सहकार्य केले जाईल महासंघाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या पथकांना पुढील वर्षी नोंदणी देण्याबाबत पुनर्विचार केला जाईल, असे ठाकूर यांनी सांगितले.  ठाकूर म्हणाले, शहरात 160, तर संपूर्ण जिल्ह्यात 266 ढोलताशा पथके आहेत. प्रत्येक पथकांत शंभर ते सहाशे सदस्यांचा समावेश आहे. पथकातल्या वाद्यांची संख्या कमी करुन त्यापुढे लाठीकाठी, टिपरी, ध्वज पथक, झांज पथकांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

का घेतला निर्णय?

मिरवणुकीत अनेक रांगांमधल्या ढोल-ताशा वादनामुळे रस्ता पूर्ण व्यापून जातो. त्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना जाण्या-येण्यास नागरिकांना जागा उरत नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. ढोल-ताशांची संख्या अनेक पथकांत शंभरावर जात असल्याने मिरवणुकीची लांबी वाढते. परिणामी मिरवणुकीला विलंब होतो. सराव होणार्‍या जागांजवळ राहणार्‍या नागरिकांना आवाजाचा त्रास होतो.
महासंघाने घेतलेले निर्णय
  • पथकांमध्ये 50 ढोल, 15 ताशे व ध्वजपथकासह एकूण 150 ते 200 वादकांचा सहभाग असेल
  • प्रत्येक वादकाच्या गळ्यात ओळखपत्र असेल.
  • कोणतेही पथक ढोलवादन करणार नाही, त्याजागी झांज पथक सहभागी होईल.
  • ढोल-ताशा पथकांकडून तीनच चौकांत जास्तीत जास्त आठ ते दहा मिनिटांपर्यंत वादनाचे खेळ सादर केले जाणार आहेत.
ढोल-ताशा पथकांच्या सरावाला अडचण आहे ती मोकळ्या जागा मिळण्याची. त्यामुळे पथकांना मिळेल त्या जागांवर सराव करावा लागत आहे. ढोल- ताशा पथकांच्या सरावांसाठी गेल्या 20 वर्षांमध्ये परवानगी घेतली जात नव्हती. पोलिस प्रशासनासोबत संपर्क समन्वयातूनच सराव केला जात होता. यंदा प्रथमच सरावाच्या परवानगीचा प्रश्न निर्माण झाला.  नागरिकांना त्रास होऊ नये, अशी आमची भूमिका आहे.
– पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघ
हेही वाचा

Back to top button