पुण्यासह राज्यात घरफोड्या करणारा सराईत जेरबंद | पुढारी

पुण्यासह राज्यात घरफोड्या करणारा सराईत जेरबंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये घरफोड्या, दरोड्याचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद, विमानतळ, येरवडा पोलिस ठाण्यातील 9 गुन्हे उघड झाले असून, 2 लाख 63 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोनू उर्फ संजीव कपूरसिंग टाक (28, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वेशांतर करून घरफोड्या करण्यात तो पटाईत आहे. जुलैमध्ये कराडमधील एका डॉक्टरच्या घरात त्याने दरोडा टाकला होता. शस्त्राचा धाक दाखवून घरातील सदस्यांना कोंडून त्याने लुटले होते.

गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान घरफोडीतील गुन्हेगार सोनू टाक हा मांजरी बुद्रुक स्मशानभूमी परिसरात थांबला असल्याची माहिती अंमलदार नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून टाक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने शहरातील विविध भागात घरफोडी केल्याची कबुली दिली.

टाक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर पुण्यासह राज्यातील कराड, महाड, पाली, अंबरनाथ आदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, युनिट सहाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतीक लाहिगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा

Goa Crime : मडगाव हादरले, भर दिवसा घरात शिरून गुंडाचा गळा चिरून खून

Pune News : साऊथ कोरियासाठी पुण्यातील मुलींनी गाठली थेट मुंबई

अहमदनगर : छावणी परिषदप्रश्नी संरक्षणमंत्र्यांना साकडे; आमदार संग्राम जगताप यांनी दिले निवेदन

Back to top button