मोशी येथील भाजी मंडईचा प्रश्न सुटेना; पदपथ, रस्त्यावर विक्रेते वाढले | पुढारी

मोशी येथील भाजी मंडईचा प्रश्न सुटेना; पदपथ, रस्त्यावर विक्रेते वाढले

मोशी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : येथील जुन्या देहू-आळंदी रोडवरील नव्याने सुरू झालेल्या छत्रपती श्री संभाजी महाराज भाजी मंडईची जागा अपुरी पडत आहे. येथील पदपथ व रस्त्यावरच भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे पादचार्‍यांना चालणे मुश्किल झाले आहे.

वाहतूककोंडीने चालक त्रस्त

याअगोदर शाळेशेजारी पुणे-नाशिक महामार्गालगत मंडई भरत होती. त्यानंतर ती वाहतूककोंडी व अतिक्रमणाचे कारण देत नवीन मंडई शेड उभारलेल्या जुन्या आळंदी रस्त्यावर सुरू करण्यात आली. येथे विक्रेत्यांना ओटेदेखील देण्यात आले. मात्र, ही जागा अपुरी पडत आहे. येथील मंडईसमोरील फूटपाथवर मंडईतीलच काही भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. जवळच महापालिकेची सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना फुटपाथवरून चालता येत नाही. त्या ठिकाणी वाहतूककोंडी होत असून काही वेळेस रुग्णवाहिकेलाही वाहतूककोंडीतून मार्ग काढताना कसरत करावी लागते. याकडे पालिका मात्र दुर्लक्ष करत आहे.

अधिकृत विक्रेत्यांना न्याय मिळावा

विक्रीला विरोध नाही मात्र बेशिस्त विक्रेत्यांवर कारवाई गरजेची आहे. तर अनधिकृत भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली तर वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच, अधिकृत भाजीविक्रेत्यांनाही न्याय मिळेल याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

अनधिकृत भाजीविक्रेत्यांवर कारवाई करा

रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनचालक, नागरिकांना या वाहतूककोंडीचा फटका बसत असून, रस्त्यावर वाहने लावल्यास कारवाई केली जावी, पार्किंगचे फलक लावावेत, अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. एकंदरीतच सध्या नव्याने सुरू झालेल्या भाजी मंडईची जागा ही अपुरी पडत असून भविष्यात मोशी गावच्या मुख्य भाजी मंडईसाठी प्रशस्त आणि मोठी जागा महापालिकेने आरक्षित करण्याची गरज आहे. जुने प्रभाग दोन व प्रभाग तीनमध्ये सध्या दिवसाआड आठवडे बाजार भरतो. त्यानेदेखील वाहतूककोंडी होतेच, त्यापेक्षा कायमस्वरूपी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाहन पार्किंग, वाहतूककोंडी होणार नाही, अशा पद्धतीने भाजी मंडई विकसित करण्याची गरज आहे.

हेही वाचा

जालना : नळाचे पाणी भरताना विजेचा शॉक लागून विद्यार्थीनीचा मृत्यू

वाढतेय फायब्रॉईडस्ची समस्या! वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे

नागपूर: मध्य रेल्वेच्या अजनी आरोग्य केंद्रात भीषण आग

Back to top button