पुणे : पुढारी वृत्तसेवा : जनजागृतीचा अभाव, धार्मिक आणि सामाजिक श्रध्दा यामुळे भारतामध्ये मेंदूमृत व्यक्तींकडून होणा-या अवयदानाचे प्रमाण कमी आहे. प्रतीक्षा यादी, आवश्यक सुविधांचा अभाव यामुळे भारतात मेंदूमृत व्यक्तींपेक्षा 'लाईव्ह डोनर' अर्थात जिवंत दात्यांकडून होणार्या अवयवदानाचे प्रमाण 93 टक्के इतके आहे. यामध्ये यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणांची संख्या सर्वाधिक आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 'भारतातील रस्ते अपघाता'च्या वार्षिक अहवालानुसार, 2022 मध्ये रस्ते अपघातांच्या 4.12 लाखांहून अधिक दुर्दैवी घटना घडल्या. यामध्ये 1.53 लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला. एवढी जीवितहानी होऊनही संभाव्य अवयवदात्यांपैकी केवळ 7 टक्के दात्यांकडून अवयवदान झाले आहे.