अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : सीमावर्ती भागातील दलालामार्फत बनावट कागदपत्रे तयार करून भारतात घुसखोरी करून राहणार्या चार बांगलादेशी नागरिकांना नाशिक व नगरच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) नगरच्या खंडाळा येथून ताब्यात घेत अटक केली. नगर तालुका पोलिस ठाण्यात अटक केलेल्या चार जणांसह अन्य सहा जणांविरुद्ध पश्चिम बंगाल व बांगलादेशातील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मो. मोहीउद्दीन नाझीम शेख, शहाबुद्दीन जहांगीर खान, दिलावरखान सिराजउल्ला खान व शहापरान जहांगीर खान (सर्व रा. सध्या खंडाळा, मूळ रा. बांगलादेश) अशी त्यांची नावे आहेत. तर, रासल एजाज शेख, सोहेल, माणिक खान, नोमान, अब्दुल कादर
(सर्व रा. बांगलादेश), कोबीर मंडल (उत्तर 24 परगणा, पश्चिम बंगाल) अशी पसार झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत नाशिक एटीएस पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रताप गिरी यांनी फिर्याद दिली. खंडाळा येथील शिवशक्ती स्टोनक्रेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी लोक राहत असून, ते विनापासपोर्ट भारतात आले आहेत, अशी माहिती नाशिक येथील एटीएस पथकाला मिळाली.
त्यानुसार नाशिक व नगर येथील एटीएसच्या पथकाने खंडाळा येथे सापळा लावून कारवाई चार जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता बांगलादेशी असल्याचे कबुल केले. बेरोजगारीला कंटाळून कामाच्या शोधात भारतात घुसखोरी करून आल्याचे त्यांनी सांगितले. एटीएसच्या पथकाने त्या चार जणांसह बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करणार्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ही कारवाई नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन खैरनार, सहायक निरीक्षक गिरी, अंमलदार वडकते, तांबोळी, प्रदीप गागरे, नगरच्या दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक जाकीर शेख, सहायक पोलिस उपनिरीक्षक राकेश खेडकर, अंमलदार गोरे, संजय हराळे यांच्या पथकाने केली.
बनावट कागदपत्रे त्यांनी मुंबई, कल्याण व सुरतमध्ये (गुजरात) तेथील स्थानिक पत्ते देऊन तयार केल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे. बनावट कागदपत्रेही त्यांनी एजंटमार्फत पैसे देऊन तयार केली. मो. मोहीउद्दीन शेख मागील सात ते आठ वर्षापासून खंडाळा येथे राहत आहे. शहाबुद्दीन जहाँगीर खान मागील आठ महिन्यांपासून तो खंडाळा येथे राहत आहे. दिलावरखान सिराजउल्ला खान मागील तीन महिन्यांपासून तर शहापरान जहाँगीर खान मागील सहा महिन्यांपासून खंडाळा येथे राहत आहे, असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
हेही वाचा