…तर आयटीआर भरूनही बसणार भुर्दंड | पुढारी

...तर आयटीआर भरूनही बसणार भुर्दंड

पुणे : इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरल्यानंतर आपण आयटीआरची पडताळणी केली नसल्यास तुम्हाला भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. आयटीआर भरल्यानंतरही संबंधितांना कर परतावा मिळणार नाही. तारीख उलटून गेल्यानंतर पडताळणी करण्यासाठी आपल्याला एक ते पाच हजार रुपयांचा दंड सोसावा लागेल. जवळपास 31 लाख करदात्यांनी अजूनही पडताळणी केली नसल्याचे आयटीआर विभागाने सांगितले आहे. प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळानुसार 6.91 कोटी करदात्यांनी 31 जुलैपर्यंत आयटीआर भरला आहे. त्यापैकी 6.59 कोटी करदात्यांनी 23 ऑगस्टपर्यंत आयटीआरची पडताळणी केली आहे.

प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार मुदतीत प्राप्तिकर भरल्यानंतर त्याची तीस दिवसांच्या आत पडताळणी करणे आवश्यक असते. या कालावधीत अशी पडताळणी न केल्यास संबंधित व्यक्तींच्या फाईलचा विचार कर परताव्यासाठी केला जात नाही. म्हणजेच संबंधित व्यक्ती जर करपरतावा मिळण्यास पात्र असली तरी तिला परताव्याची रक्कम मिळत नाही. प्राप्तिकर विभागानेदेखील करदात्यांना आयटीआर व्हेरिफाय करण्याचे आवाहन केले आहे. तीस दिवसांच्या आत आयटीआरची पडताळणी करून घ्यावी, अन्यथा इन्कम टॅक्स कायदा-1961 नुसार आपल्याला दंड भरावा लागेल, असे बुधवारी इन्कम टॅक्स विभागाने म्हटले आहे.

सीए दिलीप सातभाई म्हणाले, आयटीआरची पडताळणी आयटीआर भरल्यापासून तीस दिवसांच्या आत करावी लागते. जर शेवटच्या दिवशी म्हणजे 31 जुलै रोजी आयटीआर भरला असल्यास अंतिम मुदत 30 तारीख होईल. मुदतीनंतर पडताळणी केल्यास पाच लाखांच्या आत उत्पन्न असल्यास एक हजार आणि त्यापुढे उत्पन्न असल्यास पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागतो.

कशी कराल पडताळणी…

ई-फाईलिंग पोर्टलवर गेल्यानंतर ई-व्हेरिफाय रिटर्नवर गेल्यानंतर ई-फाईल टॅबमार्फत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यासाठी आधारकार्डला नोंदणीकृत केलेल्या मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येतो. त्या माध्यमातूनच ही प्रक्रिया पूर्ण करता येते. थोडक्यात आयटीआर फाईल केलेली व्यक्ती आणि त्यांनी दिलेली माहिती पूर्णतः बरोबर असल्याची खातरजमा केली जाते.

हेही वाचा :

Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेत कोल्हापूरकन्येचाही सहभाग

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

Back to top button