Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेत कोल्हापूरकन्येचाही सहभाग | पुढारी

Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेत कोल्हापूरकन्येचाही सहभाग

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भारताची चांद्रयान-3 मोहीम फत्ते झाली. विक्रम लँडर चंद्रावर उतरले अन् संपूर्ण भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. सारा देश जल्लोषात न्हाऊन गेला, त्याला कोल्हापूरही अपवाद नव्हते. पण गुरुवारी कोल्हापूरकरांचा ऊर आणखी अभिमानाने भरून गेला, त्यालाही कारण तसेच ठरले. ज्या चांद्रयान मोहिमेने सार्‍या जगालाच अचंबित केले, ती मोहीम फत्ते करण्यात इस्रोतील हजारो वैज्ञानिक, तंत्रज्ञ, कर्मचार्‍यांचे मोठे योगदान आहे. त्यात कोल्हापूरच्या कन्येचाही वाटा आहे.

सुनीता कपूर-राणे असे या कन्येचे नाव आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरले अन् इस्रोत जल्लोष झाला. या जल्लोषाचे अनेक फोटो शेअर झाले. यात सुनीता यांचेही काही फोटो होते. वर्षानगर येथे राहणार्‍या सुनीता यांचे कुटुंबीय मूळचे सांगली जिल्ह्यातील; पण वडील कोल्हापूरला स्थायिक झाले आणि त्या कोल्हापूरवासीय झाल्या. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण कोल्हापुरातच झालेल्या सुनीता यांनी यापूर्वी कसबा बावड्यात असलेल्या वाय. बी. पाटील पॉलिटेक्निकमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सुनीता यांनी काही काळ ‘बीएआरसी’ अर्थात भाभा अणुशक्ती रिसर्च सेंटरमध्ये काम केले आहे. यानंतर 1992 पासून त्या इस्रोत कार्यरत आहेत. सध्या त्या वरिष्ठ शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत.

वर्षानगर येथील त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता, सुनीता यांचे भाऊ सुनील कपूर म्हणाले, गेली कित्येक वर्षे इस्रोत बहीण काम करते इतकेच नातेवाईक आणि जवळच्या लोकांना माहीत होते. चांद्रयान मोहिमेत तिचा सहभाग असल्याबद्दल आम्हालाही सार्थ अभिमान आहे. लहानपणापासून शेजारी राहणार्‍या शेखर मंडलिक यांनीही आम्हाला लहानपणापासून वेगवेगळ्या गोष्टींवर, अभ्यासात मार्गदर्शक करणार्‍या, स्वत: हुशार असणार्‍या, चहा, मटण, पोळी आदी खाद्यपदार्थ उत्तम करणार्‍या आमच्या भगिनीचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगितले.

Back to top button