पुणे : सुरक्षा रक्षकांना मारहाण; चंदनाची झाडे चोरली | पुढारी

पुणे : सुरक्षा रक्षकांना मारहाण; चंदनाची झाडे चोरली

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सुरक्षा रक्षकांना मारहाण करत सात ते आठ जणांच्या टोळक्याने खडकी येथील किर्लोस्कर कंपनीच्या आवारातून अकरा हजार रुपयांची तीन चंदनाची झाडे चोरी केली. याप्रकरणी, सिक्युरिटी सुपरवायझर प्रदीप देशमुख (वय 42, रा. काळेवाडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ जणांच्या विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.22) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख हे खडकी येथील किर्लोस्कर कंपनीत सिक्युरिटी सुपरवाझयर म्हणून काम करतात. पहाटे साडेचारच्या सुमारास मागील भिंतीच्या कंपाऊंडवरून तीन व्यक्ती आतमध्ये येताना दिसल्या. हे पाहून त्यांनी शिट्टी वाजवली. तिघा दरोडेखोरांनी देशमुख यांना धक्काबुक्की करून खाली बसवले. मात्र, त्यांच्या शिट्टीचा आवाज ऐकून इतर सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याकडे धाव घेतली होती. एका दरोडेखोराने राजेंद्र पाटील याच्या पाठीत मारून त्यांना खाली पाडले. तर इतरांना धक्काबुक्की केली. यावेळी आणखी दोन दरोडेखोर आले.

त्यांनी लोखंडी रॉडचा धाक दाखवत ’आम्ही तयारीने आलो आहे. शांत बसा, आम्ही झाडे कापून निघून जाऊ.’ त्या वेळी एक गाडी मुख्य दरवाजातून आत आली. त्यांनी कटरच्या साह्याने झाडे कापण्यास सुरुवात केली. दरम्यान, दरोडेखोर आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेली झटापट शेजारील इमारतीतील एका व्यक्तीने पाहिली होती. त्याने तत्काळ याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. काही वेळातच खडकी पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षा रक्षक पोलिस आले असे ओरडले. त्या वेळी गाडी पाहून दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. गेल्या काही दिवसांपासून शहरात चंदनाच्या झाडांची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हे निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Seema Deo : देखणी अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड

पुणे : महागड्या गाड्यांची हायटेक चोरी करणारे अटकेत

Back to top button