Seema Deo : देखणी अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड

सीमा देव
सीमा देव

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय साकारणाऱ्या अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना अल्झायमरचा त्रास होता. जवळपास ८० मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. अनेकविध चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय साकारताना त्यांच्या शालिनतेचे, सौंदर्याचे दर्शन होत होते. त्यांची अनेक गाणी गाजली.

त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आनंद, जगाच्या पाठीवर, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या अशा एकापेक्षा चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केलं होतं.

त्यांचे मुळचे नाव नलिनी सराफ असं होतं. हिंदी चित्रपट- मिया बीबी राजी (१९६०) मध्ये त्यांनी रजनी ही भूमिका साकारली होती. 'जेता' (२०१०) मध्ये सुमति यशवंत राजाध्यक्षच्या भूमिकेत त्या दिसल्या होत्या. १९८७ रोजी त्या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या. शिवाय, राजा परांजपे लाईफटाईम अचीव्हमेंट ॲवॉर्ड (२०१४) ने गौरवण्यात आले होते.

सीमा देव यांचा २७ मार्च, १९४२ रोजी गिरगाव, मुंबई येथे जन्म झाला होता. १ जुलै १९६३ रोजी त्या रमेश देव यांच्याशी विवाहबद्ध झाल्या होत्या. रमेश देव हेदेखील उत्तम अभिनेते होते. त्यांना दोन मुले अजिंक्य देव (अभिनेता), अभिनय देव (चित्रपट दिग्दर्शक) आहेत.

दीर्घकाळ आजारी होत्या सीमा देव

ठाणे : पुढारी वृत्तसेवा – मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत शालीन चेहरा अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे गुरूवारी दीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा अभिनेते अजिंक्य, अभिनय देव, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या २ वर्षांपासून त्या स्मृतीभ्रंशाच्या आजाराने ग्रस्त होत्या. वास्तव जीवनात आणि पडद्यावरही एकजीव दिसलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील मोजक्या जोड्यापैकी रमेश आणि सीमादेव यांचा समावेश होता. आपल्या शांत आणि संयत अभिनयाने चित्रपटसृष्टीवर वेगळी छाप उमटवली होती. माहेरच्या नलिनी सराफ असलेल्या सीमा यांनी १९५७ मध्ये आलिया भोगासी या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. सुमारे १०० चित्रपटात त्यांनी लहान -मोठ्या भूमिका साकारल्या. मोठ्या स्टारकास्ट असलेल्या आनंद चित्रपटात देव पती – पत्नीने आपल्या छोट्या भूमिकेतही आपला ठसा उमटवला होता. वरदक्षिणा, जगाच्या पाठीवर कोशिश, सरस्वतीचंद्र या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news