राष्ट्रवादीचा बडा नेता प्राप्‍तिकरच्या ‘रडार’वर | पुढारी

राष्ट्रवादीचा बडा नेता प्राप्‍तिकरच्या ‘रडार’वर

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या घरांवर प्राप्‍तिकर व सक्‍तवसुली संचालनालयाच्या (ईडी) छापेमारीनंतर आता विद्यमान मंत्री व राष्ट्रवादीचा बडा नेता प्राप्‍तिकर विभागाच्या ‘रडार’वर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय प्राप्‍तिकर विभाग व राज्यातील अधिकार्‍यांची छापेमारीच्या कारवाईसाठी बैठक सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते एक-एककरून प्राप्‍तिकर, ‘ईडी’च्या जाळ्यात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची बहीण व जवळच्या नातेवाईकांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी पुन्हा त्यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अधिकार्‍यांचे पथक राष्ट्रवादीचा बडा नेता याच्यावर कारवाई करण्यापूर्वी स्थानिक परिणाम काय होतील, याचा आढावा बैठकीतून घेत आहेत. ही कारवाई करण्यासाठी 24 खासगी गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. अधिकार्‍यांच्या पथकात हितसंबंधाचे स्थानिक अधिकारी असू नयेत याची खबरदारी घेण्यात येत आहे.

यासाठी पुण्याबाहेरील अधिकार्‍यांना बोलावण्यात आले आहे. या सर्व अधिकार्‍यांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले असून, कारवाईला निघण्यापूर्वी त्यांना सहभागी करून घेतले जाणार असल्याचे समजते.

Back to top button