केंद्राच्या निर्णयाने शेतकर्‍यांचे कोट्यवधींचे नुकसान | पुढारी

केंद्राच्या निर्णयाने शेतकर्‍यांचे कोट्यवधींचे नुकसान

चाकण : पुढारी वृत्तसेवा : मागील महिन्यापासून कांद्याच्या भावात वाढ होत असतानाच कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी व्यक्त केली. या निर्णयाने कांद्याच्या भावात घसरण सुरू झाली आहे. कांद्याच्या भावात प्रतिक्विंटलला 200 रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 2500 रुपयांवरून 2300 रुपयांवर खाली आला आहे.

पुढील काळात यात आणखी घसरण होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. मध्यपूर्व आशिया तसेच दक्षिण पूर्व आशियातील विविध आखाती देश दुबई, मलेशिया, सिंगापूर , मस्कत येथे चाकणच्या बाजारातील कांद्याची निर्यात होत असते. टिकाऊ, गावरान, लाल भारतीय कांद्याला बांगलादेश, सिंगापूर, थायलंड, मालदीव, नेपाळ, हाँगकाँग आणि इंडोनेशिया या देशांतून सध्या मागणी असते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे, असे कांदा उत्पादक शेतकर्‍यांसह अडते व निर्यातदारांनी सांगितले.

खेड बाजार समितीच्या चाकण येथील मार्केटमध्ये मागील आठवड्यापर्यंत कांद्याचा भाव किलोला 26 रुपयांवर गेला होता. चाकण येथील बाजारात शनिवारी (दि. 19) कांद्याची एकूण आवक 2 हजार क्विंटल झाली. चांगला भाव मिळत असल्याने बाजारात कांद्याची आवक वाढली होती. चांगला भाव मिळण्याची अपेक्षा असताना केंद्राच्या निर्णयाने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले गेले आहे.

टोमॅटोनंतर कांद्याचे भाव सामान्यांना रडवणार असल्याचे म्हटले जात होते. देशांतर्गत महागाईला आळा घालण्याचे कारण पुढे करून कांद्याचे निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. निर्यात शुल्काच्या वाढीनंतर कांद्याच्या भावात आणखी घसरण होणार आहे. घाऊक बाजारात कांद्यांचे दर 22 ते 26 रुपये किलोच्या घरात होते. त्यात आता घसरण सुरू झाली असून, हे दर 20 ते 23 पर्यंत घसरले आहेत.
                                                 – बाळसाहेब धंद्रे, सचिव, खेड बाजार समिती. 

हेही वाचा :

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनरसह ५ कारचा अपघात; २ ठार, ४ जखमी

राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प नाशिकमध्ये 

Back to top button