निरा देवघर धरण 100 टक्के भरले | पुढारी

निरा देवघर धरण 100 टक्के भरले

निरा / भोर : पुढारी वृत्तसेवा :  निरा खोर्‍यातील निरा देवघर धरण रविवारी (दि. 20) दुपारी 4 वाजता 100 टक्के भरले असून, धरणाच्या विद्युतगृहातून 750 क्युसेक प्रतिसेंकद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र यंंदा निरा खोर्‍यातील भाटघर, गुंजवणी, वीर ही तीन धरणे पावसाच्या कमी प्रमाणामुळे ऑगस्ट महिन्यातील तिसरा आठवडा संपला तरी भरलेली नाहीत. त्यामुळे सध्यातरी चिंतेचे कारण नसले तरी उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

गतवर्षी निरा खोर्‍यात समाधानकारक पाऊस झाल्याने ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात निरा देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी ही चारही धरणे 100 टक्के भरलेली होती. यंदा मात्र पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने गतवर्षापेक्षा एका आठवड्याने उशिरा का होईना निरा देवघर धरण रविवारी दुपारी 4 वाजता 100 टक्के पूर्ण क्षमतेने भरले. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला उशिरा सुरुवात झाली. गेल्या महिनाभरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने निरा देवघर, भाटघर, गुंजवणी धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली. मात्र त्यानंतर पावसाने चांगलीच ओढ दिली.

रविवारी (दि. 20) दुपारी 4 वाजेपर्यंत निरा देवघर धरणात 11.729 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. भाटघर धरण 88.06 टक्के भरले आहे असून, धरणात 20.696 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. गुंजवणी धरण 81.76 टक्के भरले असून, धरणात 3.017 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. तर वीर धरण 75.80 टक्के भरले असून, धरणात 7.132 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती निरा पाटबंधारे उपविभागाचे अभियंता योगेश भंडलकर यांनी दिली.

हेही वाचा : 

Vijayakumar Gavit : मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायसारखे डोळे होतात, मुलीही पटतात: विजयकुमार गावित

डाळींचा तोरा वाढला ! दरात वाढ

Back to top button