पिंपरी : प्राणिसंग्रहालयावर वारेमाप खर्च; सात वर्षांपासून प्रवेशद्वाराला टाळे | पुढारी

पिंपरी : प्राणिसंग्रहालयावर वारेमाप खर्च; सात वर्षांपासून प्रवेशद्वाराला टाळे

मिलिंद कांबळे

पिंपरी(पुणे) : अनियोजनबद्ध कारभारामुळे गेल्या सात वर्षांपासून नागरिकांसाठी बंद आहे. मात्र, या संग्रहालयाच्या नूतनीकरण व सुशोभीकरणावर वारेमाप खर्च करण्याची मालिका सुरूच आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही कामे मुदतीमध्ये पूर्ण होत नसल्याने महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

पर्यटन वाढणार असल्याचा महापालिकेचा दावा

संभाजीनगर, चिंचवड येथे भर लोकवस्तीमध्ये तसेच, गर्द हिरवळीत 7 एकर परिसरात निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय आहे. नव्याने तयार  करण्यात येत असलेल्या प्राणिसंग्रहालयामुळे पर्यटन वाढणार असल्याचा महापालिकेचा दावा आहे. दिल्लीच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अटी व नियमानुसार प्राणिसंग्रहालय  उभारणी करण्यात येत आहे. या कामास मे 2016 ला सुरुवात झाली. तेव्हापासून संग्रहालयास टाळे आहे.

ठेकेदारावर कारवाई करण्यास टाळाटाळ

दोन टप्प्यांतील कामे रडतखडत पूर्ण झाली. त्यावर एकूण 19 कोटींचा खर्च झाला. कामास विलंब होऊनही संबंधित ठेकेदारांवर पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. आता अखेरच्या तिसर्‍या टप्प्यातील 14 कोटी खर्चाचे काम केले जाणार आहे. त्याची मुदत 1 वर्ष आहे. मुदतीमध्ये काम झाल्यास आणखी एक वर्ष प्राणिसंग्रहालय बंद राहणार आहे.

परिसरात झाडी-झुडपे

तब्बल 33 कोटींचा खर्च करण्यात येत आहे. संथ गतीने कामे सुरू असल्याने परिसरात झाडी-झुडपे उगवली आहेत. पूर्ण झालेले काम धूळ खात आहे. तर, काही ठिकाणी नासधूस झाली आहे. गेल्या 7 वर्षांपासून प्राणिसंग्रहालयास टाळे असल्याने सर्प, प्राणी, पक्षी दर्शन बंद असल्याने पर्यटनास खो बसला आहे. कमी व दाटीवाटीच्या ठिकाणी प्राणी व पक्षी असल्याने त्यांचा कोंडमारा होत आहे. त्यातील काही मोर, प्राणी व सर्प मेले आहेत. सर्प, पक्षी व प्राणी सांभाळण्यासाठी कर्मचार्‍यांवर पालिकेकडून लाखोंचा खर्च होत आहे. तसेच, पर्यटन बंद असल्याने तिकीटातून मिळणारे उत्पन्नही बंद आहे. कोट्यवधीचा खर्च करूनही प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले केले जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

छोट्याशा जागेत 185 प्राणी, सर्प, पक्षी

कासव गतीने काम सुरू असल्याने एका खोलीत प्राणी, पक्षी व सर्प ठेवण्यात आले आहेत. विविध जातीचे एकूण 55 सर्प तसेच, पक्षी आहेत. तर, 2 मगरी आहेत. इतर प्राणी धरून एकूण 185 प्राणी व पक्षी सध्या येथे आहेत. त्यांना भाजीपाला, पांढरे उंदीर व चिकन असे खाद्य दिले जाते. त्यांच्यावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी कर्मचारी, मजूर, सुरक्षारक्षक व पशुवैद्यकीय अधिकारी नेमले आहेत. छोट्याशा जागेत असल्याने प्राणी व सर्पाचे हाल होत आहेत.

असा आहे खर्च पहिल्या टप्प्यात 13 कोटी

पहिल्या टप्प्यात 13 कोटींची खर्चाची स्थापत्य कामे करण्यात आली. प्राणिसंग्रहालयासाठी प्रशासकीय इमारत, स्टोअरेज रूम व स्टाफ क्वॉर्टर, पक्ष्यांसाठी स्वतंत्र कक्ष, मगर व सुसर कक्ष, सर्पालय, अंतर्गत पादचारी मार्ग, स्वच्छतागृह हे काम करण्यात आले. ते काम डिसेंबर 2018 ला पूर्ण झाले.

दुसर्‍या टप्प्यात 6 कोटी

दुसर्‍या टप्प्याच्या कामासाठी 5 कोटी 82 लाख खर्च करण्यात आला. त्यात स्वतंत्रपणे सर्पोद्यान व पक्ष्यालय उभारण्यात आले. ते काम काम मार्च 2021 ऐवजी 2022 च्या मध्याला पूर्ण झाले.

तिसर्‍या टप्प्यात 14 कोटी

प्राणी, पक्षी व सर्पासाठी योग्य अशी पर्यावरणपूरक अधिवास तयार केला जाणार आहे. त्याबाबत बरीच चर्चा व खल झाल्यानंतर त्या कामाची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. येत्या 2 ते 3 आठवड्यात स्थायी समितीची मंजुरी घेऊन काम सुरू केले जाईल. त्या कामाची मुदत 1 वर्ष आहे.
शेवटच्या टप्प्यातील सुशोभिकरण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच स्थायी समितीची मंजुरी घेऊन काम सुरू केले जाईल. बारा महिन्यांच्या मुदतीमध्ये सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पशुवैद्यकीय विभाग प्राणिसंग्रहालय नागरिकांना खुले करण्याबाबत निर्णय घेईल.
– मनोज सेठिया, सहशहर अभियंता 
हेही वाचा

Back to top button