नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जगताप यांनी अंतरिम जामीन मिळण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने जुलैपर्यंत तहकूब केली आहे.
ज्योती जगताप यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे. काल बुधवारी या अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र, ती नंतर आजपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानुसार गुरुवारी न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एस. व्ही. एन भट्टी यांच्या खंडपीठाने सुनावणी पूर्ण होऊ शकली नसल्याने ती जुलैपर्यंत तहकूब केली.
सर्वोच्च न्यायालयाला उद्या १७ मे पासून उन्हाळी सुट्टी लागणार आहे. या सुट्टीनंतर ८ जुलै रोजी न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरु होणार आहे. पुण्यातील भीमा कोरेगाव येथे २०१८ मध्ये झालेल्या जातीय दंगलीप्रकरणी कथित माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जगताप यांना बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा १९६७ अंतर्गत अटक करण्यात आली होती.
अटकेनंतर सप्टेंबर २०२० पासून त्या तुरुंगात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
हे देखील वाचा-