पुणे : 46 लाखांच्या मेफेड्रॉन, चरसची तस्करी; चौघांना अटक | पुढारी

पुणे : 46 लाखांच्या मेफेड्रॉन, चरसची तस्करी; चौघांना अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  एमडी कोकेनसह इतर अमली पदार्थांची तस्करी करून त्यांची विक्री करणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक 1 ने बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून 46 लाख 59 हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. सागर कैलास भोसले (वय 26, शंकरनगर, खराडी) त्याची साथीदार महिला, तसेच अजितसिंग इंद्रजितसिंग भवानीया (वय 40, रा. गुडविल ऑरचीड, धानोरी), इम्ररीन गॅरी ग्रीन (वय 37, रा. खेसे पार्क, लोहगाव रोड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दि. 14 ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक 1 हे मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अमलदार विशाल दळवी यांना लोणकरवस्ती येथे एक महिला आणि एक व्यक्ती एमडी कोकेन पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. याबाबत दळवी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांना माहिती दिली. त्यानुसार लोणकरवस्ती येथे छापा टाकून सागर भोसले याला अटक करण्यात आली. या वेळी त्याच्याकडून 44 लाख 11 हजाराचे 208 ग्रॅम 650 मिलीग्रॅम मेफेड्रॉन व 5 ग्रॅम 550 मिलीग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.

दरम्यान, अजितसिंग इंद्रजितसिंग भवानीया (40, रा. गुडविली ऑरचीड, धानोरी) याच्याकडून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याने त्याला आणि त्याचा साथीदार इम्ररीन गॅरी ग्रीन (37, रा. खेसे पार्क, लोहगाव रोड) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडूनही कोकेन आणि चरस असे तब्बल 2 लाख 48 हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, अंमलदार मारुती पारधी, मनोज साळुंके, राहुल जोशी, उत्तेकर यांच्या पथकाने केली.

हेही वाचा :

कर्नाटकात लोकायुक्तांचा दणका; ४८ ठिकाणी छापे

नाशिक : बाळंतिणीची बाळासह झोळीतून रुग्णालयवारी, तब्बल तीन किलोमीटर पायपीट

Back to top button