पिंपरी : भूगाव बाह्यवळण मार्गाचे काम लवकरच मार्गी ; पीएमआरडीएला संमती | पुढारी

पिंपरी : भूगाव बाह्यवळण मार्गाचे काम लवकरच मार्गी ; पीएमआरडीएला संमती

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सुटल्यानंतर आता पुणे-कोलाड रस्त्यावरील अत्यंत महत्त्वाच्या भूगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्याही लवकरच दूर होणार आहे. 95 टक्के जमीनमालकांनी चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) आणि विकास हस्तांतरण हक्काच्या (टीडीआर) मोबदल्यात पीएमआरडीएला संमतीपत्र दिले आहे. त्यामुळे लवकर भूगाव बाह्यवळणाच्या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात दर्शविलेला 18 मीटर रुंदीचा व 800 मीटर लांबीच्या भूगाव बाह्यवळण मार्गासाठी 1.44 हेक्टर जमिनीची गरज आहे. या साठी एकूण 41 जमीन मालक खातेदार यांची संमती आवश्यक होती. त्यापैकी 37 भूखंडधारकांनी चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) अथवा विकसन हक्क निर्देशांकाच्या (टीडीआर) मोबदल्यात जमिनीच्या आगाऊ ताब्याच्या संमतीपत्रावर स्वाक्षरी केली आहे. हा रस्ता चांदणी चौक ते कोलाड (जि. रायगड) या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

रस्त्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाचे काम पीएमआरडीए करणार आहे. त्यानंतर ही जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सुपूर्त केली जाईल. त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हे राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या (एनएचएआय) मदतीने संबंधित रस्त्याचे बांधकाम करणार आहे या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहणाची संमती प्राप्त करून घेण्याचे काम मुख्य अभियंता अशोक भालकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाचे वरिष्ठ अभियंता अमित तिडके व सहाय्यक नगररचनाकार विवेक डुब्बेवार यांनी पाहिले. या कामासाठी ग्रामपंचायत भूगाव यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील सहकार्य केले.

भूगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी जमीनमालकांची आगाऊ ताबा संमती मिळाली आहे. त्यामुळे हे क्षेत्र लवकरच रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात देऊन पुढील कार्यवाही सुरू होईल. त्यामुळे या रस्त्यावरील कोंडी कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
                                – राहुल महिवाल, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

..

Back to top button