टाकळी हाजीतील आरोग्य केंद्र ‘रामभरोसे’ | पुढारी

टाकळी हाजीतील आरोग्य केंद्र ‘रामभरोसे’

टाकळी हाजी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कामात दिरंगाई करत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांमधून केल्या जात आहेत. या अधिकार्‍यांची त्वरित बदली करून नवीन कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 12 गावे अंतर्भूत असून, 4 ठिकाणी उपकेंद्रे सुरू आहेत. या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्वसामान्य रुग्ण औषधोपचार घेण्यासाठी येत असतात.

मात्र, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनेकदा कर्तव्यावर हजर नसल्याचे तसेच कामात हलगर्जीपणा करत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून केल्या जात आहेत. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. रुग्णांना खासगी दवाखाना किंवा शिरूर, मंचर अशा ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे. अनेकदा वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झाल्याने गरोदर महिलांना प्रसूतीसाठी पर्यायी मार्ग निवडावा लागतो. अशीच एक घटना गेल्या दोन आठवड्यांपूर्वी झाली आहे.

निवासी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने गरोदर महिलेची रात्रीच्या वेळी प्रवासातच प्रसूती झाली. सुदैवाने बाळ आणि माता दोघेही सुखरूप आहेत. मात्र, अशा घटनांमध्ये बाळ व माता या दोघांच्याही जीवितास धोका संभवतो. सध्या साथीच्या आजारांनी थैमान घातले असताना वैद्यकीय अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांत जावे लागत आहे. यामध्ये अधिकचा वेळ, खर्च आणि त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने बेजबाबदार वैद्यकीय अधिकार्‍यांची त्वरित बदली करून नवीन कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हेही वाचा

नानगाव : रस्त्याच्या कामाला गतिरोधक ठरतंय कोण?

पार्किंग नसल्याने मेट्रो प्रवासाला ब्रेक?

नगरमध्ये माझी माती, माझा देशला प्रारंभ

Back to top button