जलसंकट! वागजवाडीला तीन दिवसांआड पाणी; पाणी विकत घेण्याची वेळ | पुढारी

जलसंकट! वागजवाडीला तीन दिवसांआड पाणी; पाणी विकत घेण्याची वेळ

माणिक पवार

नसरापूर : पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या भोर तालुक्यालाही यंदा भीषण दुष्काळाची झळ बसली आहे. तालुक्यातील वागजवाडी, राऊतवाडीला पाणीटंचाईचा मुकाबला करावा लागत आहे. भरपूर पाऊस पडत असलेल्या या भागातील ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीचे पाणी कमी झाल्याने तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
भूगर्भातील पाणी कमी झाल्याने या भागातील विहिरी आटल्या आहेत. गावकीच्या विहिरीतून दर तीन दिवसांनी पिण्याचे पाणी मिळत आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते 50 रुपयांना एक बॅरल दुसर्‍या गावातून आणत आहेत.

ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते शिवारातील विहिरीवरून पाणी आणत आहेत. जनावरांसाठी पाणी विकत आणावे लागत आहे. दूरवर नेऊन त्यांची तहान भागवावी लागत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. वागजवाडी आणि राऊतवाडीमध्ये तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांना अल्प पाणी मिळत असल्याने खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे, असे सुधीर कारळे यांनी सांगितले. येथे पिण्यासाठीच पाणी नाही, तर घर कसे बांधू? असा सवाल करीत स्वतःचे घराचे काम बंद ठेवल्याचे दिलीप मोरे यांनी सांगितले. संभाजी राऊत, शशिकला राऊत आदींनी पाण्याच्या तुटवड्याबाबत नाराजी व्यक्त केली.

ग्रामस्थांना पाणीपुरवठा दिवसाआड होत आहे. विहिरीत समाधानकारक पाणी उपलब्ध करण्यासाठी तातडीने बैठक घेऊन नियोजन करण्याचे काम सुरू आहे

– निकिता आवाळे, सरपंच

नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्यासाठी गावच्या हद्दीतील इतर विहिरींचे अधिग्रहण करण्याची कार्यवाही करीत आहोत.

– ज्योती घायतडक, ग्रामसेविका

हेही वाचा

Back to top button