पिंपरी : पालिकेच्या काही दवाखान्यांमध्ये औषधांचा तुटवडा | पुढारी

पिंपरी : पालिकेच्या काही दवाखान्यांमध्ये औषधांचा तुटवडा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या काही दवाखान्यांमध्ये औषधांअभावी रुग्णांची परवड होत आहे. त्यांना पालिकेचे रुग्णालय गाठावे लागत आहे किंवा वेळप्रसंगी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. तथापि, पालिकेकडे पुरेसा औषध साठा असून तुटवडा नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पालिकेची शहरात 9 रुग्णालये आहेत. तसेच, विविध भागांमध्ये एकूण 29 दवाखाने आहेत. त्याचप्रमाणे, जिजाऊ क्लिनिक अंतर्गतदेखील काही दवाखाने सुरू केले आहेत. पालिका प्रशासनाकडून रुग्णालयांमध्ये विविध वैद्यकीय सुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर दवाखान्यांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

गरजेनुसार औषधांचा पुरवठा
महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांना आवश्यक औषधे पुरविण्यासाठी महापालिकेकडे पुरेसा साठा असल्याचा दावा यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील औषध भांडार विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. दवाखान्यांना गरजेनुसार लागणारी औषधे पुरविली जातात. थंडी, तापावरील औषधे, टॉनिक, मल्टिव्हिटामिनच्या गोळ्या, उच्च रक्तदाब, मधुमेह आदींवरील औषधेदेखील दवाखान्यांना उपलब्ध करून दिली जातात, असे सांगण्यात आले.

एक उदाहरण
रुपीनगर येथील महापालिकेच्या दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या एका रुग्णाच्या घशात खवखव होत होती. त्याची त्यासाठी बाह्यरुग्ण विभागात तपासणी करण्यात आली. मात्र, त्यांना तेथे औषधे मिळाली नाहीत. त्यांना त्यासाठी यमुनानगर रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. तेथे गेल्यानंतर थेट औषधे न देता पुन्हा केसपेपर काढण्यास सांगितले. त्यामुळे अखेरीस संबंधित रुग्णाने कंटाळून खासगी दवाखान्याचा आधार घेतला.

औषधांसाठी रुग्णांची धावाधाव
महापालिकेचे पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी, रुपीनगर, थेरगाव अशा विविध भागांमध्ये दवाखाने आहेत. नागरिकांना घराजवळ असणार्‍या या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी जाणार्‍या नागरिकांना बर्‍याचदा विविध प्रकारची औषधे मिळत नाही. ही औषधे घेण्यासाठी त्यांना एक तर महापालिकेचे रुग्णालय गाठावे लागते किंवा खासगी मेडिकलमधून औषधे घ्यावी लागतात. या दवाखान्यांमध्ये प्रामुख्याने केवळ बाह्यरुग्ण विभागाची सुविधा आहे. आठवड्यातून एक दिवस फिजिशियन, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ उपचारासाठी येतात. तर, महिन्यातून एकदा मानसोपचार तज्ज्ञ, कान-नाक आणि घसा तज्ज्ञ तसेच नेत्ररोग तज्ज्ञ तपासण्यासाठी येतात.

महापालिका रुग्णालये व दवाखान्यांसाठी लागणारी औषधे गरजेनुसार पुरविली जात आहेत. सध्या औषधांचा तुटवडा नाही. नागरिकांना अडचण जाणवत असल्यास त्याचे निराकरण करण्यात येईल.
         – राजेश निकम, फार्मासिस्ट, औषध भांडार विभाग, वायसीएम रुग्णालय.

दवाखान्यासाठी आवश्यक औषधे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मिळालेली आहे. त्यामुळे सध्या येथील दवाखान्यात औषधांची अडचण नाही.
                    – डॉ. प्रफुल्ल तपशाळकर, महापालिकेचा पिंपळे सौदागर दवाखाना.

Back to top button