पुणे बनतेय दहशतवाद्यांचा आसरा; देशातील घातपाताची लिंक मुंबईनंतर थेट पुण्यापर्यंत | पुढारी

पुणे बनतेय दहशतवाद्यांचा आसरा; देशातील घातपाताची लिंक मुंबईनंतर थेट पुण्यापर्यंत

महेंद्र कांबळे

पुणे : पुणे म्हणजे विद्यानगरी. आयटी हब. पर्यटन आणि ऑटोमोबाईल हबही. त्यामुळे या ठिकाणी नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात आहे. कामगाराचे सामान्य जीवन जगताना दहशवादी कारवाया करण्यासाठी पुण्याचा आसरा घेतला जातो. पुणे आता ‘दहशतवाद्यांचे स्लिपर सेल’ बनत असल्याचे समोर येत आहे. गेल्या 36 वर्षांपासून दहशतवादी, नक्षली कारवायांसाठी मुंबईनंतर पुण्याची निवड केली जात आहे.

पुण्यात घडलेला जनरल अरुण वैद्य यांचा खून, जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्ता, फरासखाना बॉम्बस्फोट घडवले गेले. त्याबरोबरच दहशतवाद्यांसाठी स्लिपर सेल म्हणून काम करणार्‍या ‘सीमी’चेही जाळे तपास यंत्रणांनी उघड केले होते. देशात खळबळ उडवून देणारे नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण, कॉम ड गोविंद पानसरे, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांसारख्या मोठ्या घटनेचा तपास पुण्याभोवतीच फिरत असल्याचे समोर आले आहे. साडेतीन दशकांपासून (36 वर्षे ) पुणे दहशतवादी, नक्षलवादी, खलिस्तान्यांच्या रडारवर आल्याचे विविध मोठ्या घटनांवरून दिसते.

1986

जनरल अरुण वैद्य यांचा खलिस्तान्यांकडून खून

ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा बदला घेण्यासाठी सैन्यातून निवृत्त झालेल्या जनरल अरुणकुमार वैद्य यांच्यावर गोळ्या झाडून 10 ऑगस्ट 1986 रोजी खून करण्यात आला होता. या वेळी खलिस्तान्यांनी खुनाची जबाबदारी स्वीकारत बदला घेण्यासाठी खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यात हरजिंदर सिंग जिंदा व सुखदेव सिंग सुखा या जोडीला अटक झाली होती. ’जिंदा-सुखा’ शीख ऑर्गनाईजेशन खलिस्तान कमांडो फोर्सचे सदस्य होते. दोघांना पुढे या प्रकरणात 1992 साली फाशीची शिक्षा झाली.

1999

पाकिस्तानी गुप्तहेराला केली होती पुण्यातून अटक

पाकिस्तानशी दहशतवादी संबंध पुण्यातून आयएसआय पाकिस्तानी गुप्तहेर सईद देसाई याला 14 जून 1999 रोजी अटक करण्यात आली होती. पाकिस्तानसाठी हेरिगेरी केल्याप्रकरणी देसाई याने शिवाजीनगर न्यायालयात गुन्हा कबूल केला होता. 26 ऑक्टोबरला 2007 रोजी त्याला आठ वर्षांची शिक्षा दिली होती. शिक्षा भोगल्यानंतर तो येरवडा जेलमधून बाहेर आला होता.

2006

घाटकोपर लोकल सिरीअल बॉम्बस्फोट

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संदर्भानुसार 11 जुलै 2006 रोजी मुंबई लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता. याप्रकरणात त्यामध्ये स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सीमी)च्या एकाला स्फोटाच्या संबंधातून पुण्यातून सोहेल शेख याला अटक करण्यात आली होती. त्याच्याबरोबर न्यायालयाने अकरा जणांना फाशीची शिक्षा दिली होती.

2007

पाकिस्तानचा एजंट अटकेत

पाकिस्तानचा आयएसआय एजंट विशालकुमार उपाध्याय पाकिस्तानचा आयएसआय एजंट असलेल्या विशालकुमार उपाध्याय (रा. झारखंड) याला पुण्यातून अटक 2007 साली करण्यात आली होती. त्याला 2011 मध्ये ऑफिशिअल सिक्रेट अ‍ॅक्टच्या प्रकरणात अटक झाली होती. तो पिंपरी परिसरात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. तर तो डेक्कन येथे वास्तव्यास होता. तो पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमात पडला होता. त्याने पुण्यातील लष्कराबाबतची माहिती पाकिस्तानला पाठवली होती. तसेच तो पाकिस्तानातदेखील गेला होता.

2008

गुजरात येथील बॉम्बस्फोटाशीही पुण्याचा संबंध

26 जुलै 2008 मध्ये गुजरात येथील साखळी बॉम्बस्फोटात 56 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 200 नागरिक यामध्ये जखमी झाले होते. यामध्ये लागोपाठ 22 स्फोट घडवून आणण्यात आले होते. याप्रकरणात पुण्यातील सहा जणांना अटक करण्यात आली होती. तर तीन जणांना फेब—ुवारी 2021 मध्ये फाशीची शिक्षा झाली. तर एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली होती. चौघांना कोंढव्यातून अटक करण्यात आली होती. यामध्ये एकूण 49 जणांना शिक्षा झाली होती. त्यातील 38 जणांना फाशीची शिक्षा गुजरात येथील विशेष न्यायालयाने सुनावली होती. या हल्ल्याचा इंडियन मुजाहिद्दीशी संबंध आला होता.

2010

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट

पुण्यातील जर्मन बेकरी परिसरात 13 फेब—ुवारी 2010 मध्ये इंडियन मुजाहिद्दीन संघटनेकडून बॉम्बस्फोट घडवून आणला होता. यामध्ये 17 देशी परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर 64 देशी-परदेशी नागरिक जखमी झाले होते.या प्रकरणात हिमायत बेग नावाच्या आरोपीला पुणे न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. पुढे उच्च न्यायालयात ही फाशीची शिक्षा टिकू शकली नाही. याप्रकरणात नंतर इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या यासिन भटकळ याला अटक झाली. मात्र, त्याच्यावरील खटल्याचा निकाल अद्याप लागला नाही.

2012

जंगली महाराज रस्ता साखळी बॉम्बस्फोट

1 ऑगस्ट 2012 रोजी पुण्यातील जंगली महाराज रोडवर पाच बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटामध्ये एक जण जखमी झाला होता. डेक्कन परिसरातील सहा ठिकाणी हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. त्यातील पाच बॉम्ब काही मिनिटांच्या अंतराने फुटले होते, तर एक बॉम्ब फुटला नाही. दहशतवाद्यांकडून हे बॉम्ब तयार करण्यात त्रुटी राहिल्याने मोठी दुर्घटना टळली होती. डेक्कन परिसरातील पाच ठिकाणी हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. यासंदर्भात तपास करून एटीएसने असद खान (30), इम—ान पठाण (32), हमझा सय्यद (38), इरफान लांडगे (30), मुनिब मेमन, फारुक बागवान आणि सय्यद अरीफ यांना अटक केली. या प्रकरणातील इंडियन मुजाहिद्दीनचा रियाझ भटकळ त्याचा भाऊ इक्बाल भटकळ, फयाज कागझी,
वकास, तबरेज हे गुन्ह्यात फरार होते.

2012

कतिल सिध्दीकीचा खून

जर्मन बेकरी खटल्याच्या आरोपपत्रानुसार दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न संशयातून अटक करण्यात आलेल्या महंमद कातिल सिध्दीकी याचा 8 जून 2012 रोजी येरवडा कारागृहात अंडासेलमध्ये असताना बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून खून करण्यात आला होता. याप्रकरणात शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांना याप्रकरणात अटक झाली होती. परंतु, त्याची न्यायालयाने 2019 मध्ये पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

2013

हैद्रबाद बॉम्बस्फोटातील एकालादेखील अटक

2013 मध्ये हैद्राबाद येथील दिलसुखनगर येथील बॉम्बस्फोटात 17 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 120 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. याप्रकरणात 2016 मध्ये विशेष एनआए न्यायालयाने 5 दहशतवाद्यांना शिक्षा ठोठावली होती. त्यामध्ये पुण्यातून अटक करण्यात आलेल्या एजाज शेख यालादेखील अटक करण्यात आली होती. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील इंडियन मुजाहिदीनचा यासिन भटकळचादेखील सहभागाचे स्पष्ट झाले होते.

2013

नरेंद्र दाभोलकर खून

20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात असताना ओंकारेश्वर पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला होता. याच दरम्यान हजारो लाखो कॉल तपासले गेले. हिंदुत्ववादी संघटना,भोंधू बाबा तसेच सर्वच पातळीवर पुणे पोलिस आणि एटीएसचा तपास सुरूच होता. त्या वेळी अनेकांच्या चौकशी करण्यात आल्या. सर्व बाजू तपासण्यात आल्या. या प्रकरणाचा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे. यामध्ये डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे याप्रकरणातील खटला सध्या न्यायालयात सुरू असून, यामध्ये यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती.

2014

फरासखाना बॉम्बस्फोट

10 जुलै 2014 रोजी फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवून आणला होता. सिमीच्या पाच संशयित दहशतवाद्यांचा भोपाळ आणि तेलंगणामध्ये झालेल्या चकमकीदरम्यान मृत्यू झाल्याने एटीएसने न्यायालयामध्ये खटला बंद करण्यासंदर्भात अंतिम अहवाल सादर केला होता. तिघे दहशतवादी भोपाळ येथील चकमकीत नोव्हेंबर 2016 ठार झाले होते. तर दोघे नलगौंडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार झाले होते.

2014

अरुण भेलके संशयित माओवादी

बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या अरुण भेलके याला पुणे विशेष न्यायालयाने डिसेंबर 2022 मध्ये आठ वर्षे सक्तमजुरी आणि 42 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. चाकण परिसरातून 2014 मध्ये अरुण भेलके ऊर्फ आदित्य पाटील आणि त्याची पत्नी कांचन ऊर्फ सोनाली पाटील (वय 33) यांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती. दोघांच्या विरोधात बेकायदा प्रतिबंधक हालचाल (यूएपीए) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याची पत्नी कांचन हिचा दीर्घ आजाराने ससून रुग्णालयात मृत्यू झाला.

2015

इसिसच्या संबंध आलेल्या अल्पवयीन मुलीलादेखील घेतले होते ताब्यात :

डिसेंबर 2015 मध्ये पुण्यातील 16 वर्षांच्या मुलीला इसिस (टेरर ग्रुप इस्लामिक स्टेट ऑफ इराक) संघटनेत सामील होण्यासाठी जाणार असल्याचे समजल्यानंतर तिला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले होते. तिच्याकडून सापडलेल्या मॅसेजवरून इसिसने तिला संघटनेत प्रवृत्त करत तिला सिरीया येथे बोलविल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

2015

कोनाथ मुरलीधरनला झाली होती अटक

2015 मध्ये एटीएसने पुण्यातील तळेगाव दाभाडे येथून प्रतिबंधित सीपीआय माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणातून कोनाथ मुरलीधरन याला अटक केली होती. त्याची 2019 मध्ये जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्याच्यावर यूएपीएनुसार कारवाई करण्यात आली होती.

2018

पुण्यातील प्रकरणात फरार खालिस्तानी अतिरेक्याला अटक

वेगळ्या खालिस्तान राज्यासाठी भारतातील शीख दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याचा गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली एनआयएने फरारी खलिस्तानी दहशतवादी गुरजीतसिंग निज्जर याला डिसेंबर 2020 मध्ये दिल्ली विमानतळावर अटक केली होती. गुरजीतसिंग निज्जर याला सायप्रसमधून हद्दपार करून भारतात परत पाठविण्यात आले होते. महाराष्ट्र एटीएसने 2 डिसेंबर 2018 मध्ये चाकण येथे हरपालसिंग नाईक याला बेकायदा बंदूक आणि 5 जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. याप्रकरणात निज्जर संशयित आरोपी होता. 10 जानेवारी 2019 रोजी एनआयएने हे प्रकरण आपल्या ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान सिंह, सिद्दिकी आणि फरार आरोपी गुरजीतसिंग निज्जर याने खालिस्तान राज्य स्थापनेसाठी दहशतवादी कृत्य करण्याचा गुन्हेगारी कट रचला होता.

2018

एल्गार परिषद

2018 मध्ये शनिवारवाडा परिसरात आयोजित एल्गार परिषदेत भडकाऊ भाषणे केल्यामुळे कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळल्याच्या आरोपावरून बंदी असलेल्या सीपीआयएम संघटनेशी संबंध आल्याच्या कारणावरून व देशद्रोही कृत्याच्या आरोपांवरून संशयित माओवाद्यांना अटक करून त्यांच्यावर पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात देशपातळीवरील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या सहभागावरून त्यांना अटक झाली होती. दरम्यान, हा खटलानंतर एनआयएने वर्ग करून घेत नव्याने तपास करत आरोपपत्र दाखल केले असून, मुंबई येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात खटला सुरू आहे.

2022

दोन दहशतवाद्यांना पुण्यातून अटक

लष्कर-ए-तोयबा या भारत सरकारने बंदी घातलेल्या एलईटी संघटनेत भरती करण्याकरिता प्रोत्साहित झालेल्या प्रकरणात पुणे एटीएसने इमामुल हक ऊर्फ अमामुल इम्तियाज (19, रा. पटना, जनपद गिरडीह, झारखंड सध्या रा. देवयंन्द, सहारनपूर, उत्तर प्रदेश), मोहम्मद जुनेद मोहम्मद, आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (रा. किश्तवाड, जम्मू-काश्मीर) यांना अटक केली होती. बोपोडी परिसरातून 24 मे 2022 रोजी मोहम्मद जुनैद मोहम्मद अता याला एटीएसने अटक केली होती. याप्रकरणी काहींना न्यायालयाने जामीनदेखील मंजूर केला आहे.

2022

कोंढव्यातून पीएफआयचे पदाधिकारी घेतले होते ताब्यात

2022 मध्ये एटीएसने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या कोंढव्यातील कार्यालयावर छापा टाकून अब्दुल कयूम शेख (रा. साहिल सर्वदा, कोंढवा) आणि रझी अहमद खान (रा. अशोका म्यूज, कोंढवा) यांना कोंढव्यातून ताब्यात घेतले होते. पीएफआय संघटनेच्या कोंढवा भागातील कार्यालयावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापे टाकून देशातील विविध भागांत कारवाई केली होती.

2023

इसिसचे महाराष्ट्र मोड्युल

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) इसीस या बंदी घातलेल्या संघटनेत तरुणांना भरती करण्याच्या प्रकरणात पुण्यातील हडपसर परिसरातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये भुलतज्ज्ञ म्हणून काम करणार्‍या डॉक्टर अद्नानअली सरकार याला अटक केली होती. यापूर्वी या प्रकरणात 28 जूनला गुन्हा दाखल करून मुंबई, ठाणे, पुणे येथे एनआयने छापे टाकले. या वेळी मुंबईतून तबीश नासीर सिध्दीकी, पुण्यातून जुबेरनूर मोहम्मद शेख ऊर्फ अबु नौसेबा, तर ठाण्यातून शर्जील शेख आणि जुल्फीकार अली बडोदावाला याला अटक करण्यात आली होती.

2023

डॉ. प्रदीप कुरूलकरचा कारनामा

नुकताच डीआरडीओचा संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर याने भारतातील गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला पाठविल्याप्रकरणी एटीएसकडून तपास सुरू आहे. याप्रकरणात आतापर्यंत एक आरोपपत्र दाखल झाले आहेत. त्यात महत्त्वपूर्ण माहिती तपासात समोर आली आहे. त्याच्यावर ऑफिशिअल सिक्रेट अ‍ॅक्टनुसार कारवाई केली आहे. पुरवणी आरोपपत्रदेखील दाखल होतील.

2023

दोन दशतवादी पुणे पोलिसांकडून अटक अन् दहशतवाद्यांचा मोठा कट उघड

राजस्थान येथील स्फोटके बाळगल्याच्या गुन्ह्यात फरार झालेले मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी फरार झाल्यानंतर पुण्यात राहिले. त्यांना दुचाकी चोरताना पुणे पोलिसांनी अटक केली. पुणे पोलिसांनी वेळीच दोन दहशतवाद्यांना अटक केल्यामुळे देशातील घातपाताच्या कारवाया टळल्याचे आता एटीएस करत असलेल्या तपासात निष्पन्न होत आहे. त्यांनी पुण्यात इसिस संघटनेसाठी काम केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, देशात मोठा घातपात घडवून आणण्याच्या प्रक्रियेत तेदेखील सहभागी होते. पुढे याच प्रकरणात त्यांना आसरा देणारा अब्दुल दस्तगीर पठाण, त्यांना आर्थिक रसद पुरविणारा सामिब काझी, तर यांचा म्होरक्या असलेला जुल्फीकार बडोदावाला अशा पाच जणांना आतापर्यंत याप्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Back to top button