पर्यटकांच्या गर्दीने सिंहगड ’हाऊसफुल’ | पुढारी

पर्यटकांच्या गर्दीने सिंहगड ’हाऊसफुल’

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : पावसाचा जोर ओसरला असला, तरी रविवारी सिंहगडासह खडकवालसा धरण परिसरात पर्यटकांच्या गर्दीचा पूर लोटला होता. दिवसभरात सिंहगड टोलनाक्यावर पर्यटकांकडून एक लाख 53 हजार रुपयांचा टोल वसूल करण्यात आला. वाहतूक नियोजन कोलमडल्याने सिंहगड घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, राजगड आणि
तोरणागडही पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

सिंहगड घाटरस्त्यापासून पुणे दरवाजा, कल्याण दरवाजा, नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती राजाराम महाराज समाधी परिसरासह तटबंदी बुरूज मार्ग पर्यटकांनी गजबजून गेले होते. खाद्यपदार्थ विक्री स्टॉलवर पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. खडकवासला धरण चौपाटीवर अतिक्रमण कारवाईमुळे नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती. असे असले तरी धरण परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक सायंकाळनंतर मंदगतीने सुरू होती. राजगडावर दिवसभरात पाच ते सहा हजारांहून अधिक पर्यटकांनी गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजसदरेच्या परिसरासह प्रवेशद्वार, तटबंदी व बुरुज पर्यटकांनी गजबजल्याचे चित्र दिसून आले.

सिंहगडावर दिवसभरात 1694 वाहने

सिंहगडावर रविवार दिवसभरात पर्यटकांची 1282 दुचाकी, 412 चारचाकी वाहने आल्याची नोंद झाली. तसेच पायी चालत जाणार्‍या पर्यटकांची संख्याही अधिक होती. दिवसभरात वीस ते बावीस हजारांहून अधिक पर्यटकांनी गडावर हजेरी लावली. तुरळक पावसाचा अपवाद वगळता पावसाची उघडीप होती. सकाळी अकरापासून घाटरस्त्यावरील वाहतूक मंदावल्याचे चित्र दिसून आले.

सिंहगडावर नेहमीपेक्षा या रविवारी पर्यटकांची गर्दी अधिक होती. वाहनतळ भरल्याने दुपारी दोनपासून गडावरून खाली येणार्‍या वाहनांनुसार गडावर वाहने सोडण्यात आली. यामुळे काही काळ वाहतूकही बंद करण्यात आली. कोंढणपूर फाट्यावरून टप्पा-टप्प्याने वाहने सोडण्यात आल्याने पर्यटकांची गैरसोय झाली नाही.

-बळिराम वाईकर, वनरक्षक, सिंहगड वनविभाग.

हेही वाचा

राज्यातील मोफत आरोग्यसेवेचा गरजूंना होणार लाभ

सुरजागड लोहखाणीत अपघात; अभियंत्यासह ३ जणांचा मृत्यू

हडपसर : पालिकेचे कर्मचारी आले अन् पाहणी करून गेले!

Back to top button