हडपसर : पालिकेचे कर्मचारी आले अन् पाहणी करून गेले! | पुढारी

हडपसर : पालिकेचे कर्मचारी आले अन् पाहणी करून गेले!

हडपसर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मगररपट्टा चौक परिसरातील लोहिया उद्यान व चंद्रमौलेश्वर मंदिरासमोर गेल्या दोन आठवड्यांपासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. या भागात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. तीन दिवसांपूर्वी महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी या ड्रेनेजलाईनची पाहणी केली.

मात्र, त्यांनी ही समस्या सोडविली नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. वारंवार तक्रार करूनही वानवडी क्षेत्रीय कार्यालय या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने चंद्रमौलेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नीलेश मगर यांनी संताप व्यक्त केला. मगरपट्टा चौक हा वर्दळीचा आहे. या ठिकाणी लोहिया उद्यान व महादेव मंदिर असल्याने नागरिक व भाविकांची वर्दळ असते. भाविकांना मंदिरात जाण्यासाठी सांडपाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.

दरम्यान, या ठिकाणी खाऊचे स्टॉल असल्याने या व्यावसायिकांच्या व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. महापालिकेचे अधिकारी ही समस्या सोडविण्यासाठी चालढकल करत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. लोहिया उद्यानच्या पुढे मशिदीच्या परिसरात ड्रेनेजलाईनचे चेंबर फुटले आहे. ऐन पावसाळ्यात सांडपाणी उघड्यावर वाहत असल्याने दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या तातडीने न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशारा संजय भोसले, चंद्रकांत मगर, रामदास तुपे, दिलीप गवळी आदींनी दिला आहे.

चंद्रमौलेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोहिया उद्यानात येणार्‍या नागरिकांनादेखील दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाला कळवण्यात आले आहे. मात्र, ही समस्या अद्यापही सोडविण्यात आली नाही.

– नीलेश मगर, अध्यक्ष,
चंद्रमौलेश्वर मंदिर ट्रस्ट.

गाळ अडकल्याने मगरपट्टा चौकातील ड्रेनेजलाईन तुंबली आहे. या वाहिनीची लवकरात लवकर स्वच्छता करून नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल.

– श्याम तारू, सहायक आयुक्त,
वानवडी क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

फुरसुंगीकरांना स्वातंत्र्यदिनापर्यंत शुद्ध पाणी!

सातारा : दाट धुक्यात हरवलं पर्यटन डेस्टिनेशन; विकेंडमुळे महाबळेश्वरात गर्दी

स्‍व. डिडोळकर स्‍मृती ऑडिटोरियमाठी १५० कोटी : नितीन गडकरी

Back to top button