‘Weekend’ ला सिंहगडावर वीस हजारांहून अधिक पर्यटक | पुढारी

'Weekend' ला सिंहगडावर वीस हजारांहून अधिक पर्यटक

खडकवासला (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : सलग सुट्ट्यांमुळे रविवारी सिंहगड किल्ल्यासह खडकवासला धरण चौपाटी परिसरात पर्यटकांची अलोट गर्दी झाली होती. वाहने बंद पडल्याने, तसेच वाहनतळापासून घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने दुपारी दोन ते अडीच तास वाहतूक ठप्प झाल्याने पर्यटकांची गैरसोय झाली. तर कड्याच्या दरडी कोसळत असल्याने सुरक्षेसाठी बंद करण्यात आलेल्या राजगडाच्या बालेकिल्ल्यावर हौशी पर्यटकांनी गर्दी केली होती.

सिंहगडावर दिवसभरात 1273 दुचाकी आणि 460 चारचाकी वाहने आल्याची नोंद झाली. घाटरस्ता, अतकरवाडी व कल्याण मार्गे पायी चालत जाणार्‍या पर्यटकांची संख्याही वाढली होती. दिवसभरात वीस हजारांहून अधिक पर्यटकांनी गडाला भेट दिली. दुपारी एकच्या सुमारास घाटरस्त्यावर एक कार बंद पडली, तसेच वाहनतळ भरल्याने घाटरस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूंना दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या, त्यामुळे कोंढणपूर फाट्यावर वाहतूक दोन तास बंद करण्यात आली. सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील यांच्यासह सुरक्षा रक्षक नितीन गोळे, तानाजी खाटपे, राहुल मुजुमले, रोहित पढेर, शांताराम लांघे, रमेश खामकर आदींची वाहतूक सुरळीत करण्यासाठी धावपळ सुरू होती.

हवेली पोलिस ठाण्याचे संतोष भापकर, रजनीकांत खंडाळे आदी त्या ठिकाणी आल्यानंतर काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली. पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक दिवसभर मंदगतीने सुरू होती. दुपारी चारनंतर खडकवासला धरण चौपाटीवर वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी हवेली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन नम यांच्यासह कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. तरीही खडकवासला धरणमाथ्यापासून नांदेड फाट्यापर्यंत वाहतूक कोलमडली होती.

राजगडावर दोन हजारांहून अधिक पर्यटक

राजगडावर दिवसभरात दोन हजारांहून अधिक पर्यटकांनी गर्दी केली होती. बालेकिल्ल्याच्या मार्गावर दरडी कोसळत असल्याने सुरक्षेसाठी पुरातत्व विभागाने फलक व बॅरिकेड्स लावले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत पर्यटक बालेकिल्ल्यावर जात आहेत. पुरातत्व विभागाचे पहारेकरी बापू साबळे म्हणाले, मनाईला न जुमानत पर्यटक बालेकिल्ल्यावर जात आहेत. पोलिस बंदोबस्त मिळाल्यास प्रतिबंध होईल.

हेही वाचा :

पुणे : मस्तानी तलाव अद्यापही भरेना !

वर्क फ्रॉम होममुळे आजारांना निमंत्रण; शारीरिक हालचाली कमी झाल्याचा परिणाम

Back to top button