पुणे : मस्तानी तलाव अद्यापही भरेना ! | पुढारी

पुणे : मस्तानी तलाव अद्यापही भरेना !

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा : दिवेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक मस्तानी तलावात यंदा पुरेशा पावसाअभावी अद्यापही समाधानकारक पाणीसाठा झाला नाही. तलावात पुरेसे पाणी नसल्याने या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांची निराशा होत आहे. दुसरीकडे पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे तलावाची पडझड होत आहे. त्यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर वडकी गावच्या परिसरात पेशवेकालीन मस्तानी तलाव आहे. यंदा राज्यात इतर ठिकाणी जोरदार पाऊस होत असताना या परिसरावर मात्र वरुणराजाची वक्रदृष्टी झाली आहे. तसेच डोंगरावरून वाहणारे पाणी तलावात साचण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे तलावामध्ये दरवर्षी पाणीसाठा कमी होऊ
लागला आहे.

हा तलाव 14 एकर क्षेत्रावर विस्तारला. तो भरल्यानंतर परिसरातील विहिरी आणि बोअरवेलला पाणी येत असल्याने हा परिसर बागायती झाला आहे. मात्र, मागील वर्षी व यंदा आतापर्यंत या भागात पाऊस कमी झाल्याने हा तलाव कोरडा पडत चालला आहे. पर्यटनस्थळ म्हणून मस्तानी तलावाचा विकास केला, तर शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळेल. तसेच येथे पूरक व्यवसाय सुरू होऊन रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

पाणी साठवण क्षमता झाली कमी

पुरातत्व खाते व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे देखभाल दुरुस्तीअभावी या तलावाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. चिरेबंदी संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळली आहे. झाडेझुडपे, गवतही वाढले आहे. डोंगरावरून पावसाच्या पाण्याबरोबर दगड-गोटे, माती थेट तलावात पडत असल्याने तलावाची पाणी साठवण क्षमता कमी होऊ लागली आहे.

हेही वाचा :

सांगली :  बनावटगिरीचा रानबाजार; खतांत बगॅस, थर्मलची राख, खाणमाती

सांगली : बागणीसह तीन गावांत पंजे-सवारी भेटी

Back to top button