पिंपरी : लहान मुलांमध्ये वाढले व्हायरल इन्फेक्शन | पुढारी

पिंपरी : लहान मुलांमध्ये वाढले व्हायरल इन्फेक्शन

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सकाळी वाजणारी थंडी, दुपारचे दमट वातावरण आणि सायंकाळी पुन्हा गारवा या वातावरणातील बदलामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला, तापामुळे बेजार झालेल्या रुग्णसंख्येत गेल्या महिन्याच्या तुलनेत सुमारे 10 ते 20 टक्क्याने वाढली आहे. महापालिका़ व खासगी रुग्णालयांतील बालरोगतज्ज्ञांकडे तपासणीसाठी येणार्‍या एकूण रुग्णांमध्ये जवळपास 80 टक्के रुग्ण हे व्हायरल इन्फेक्शन (विषाणूजन्य संसर्ग) झालेले असल्याचे आढळून येत आहे.

महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये सध्या सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब आणि डेंग्यू यांच्या उपचारासाठीच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. पालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात सध्या बालरोग विभागामध्ये दररोज विविध आजारांवरील उपचारासाठी 100 ते 150 मुले तपासणीसाठी येतात. त्यापैकी 70 ते 80 मुलांना व्हायरल इन्फेक्शन असल्याचे आढळून येत आहे. खासगी रुग्णालयांत सरासरी 200 ते 250 मुले व्हायरल इन्फेक्शनवरील उपचारासाठी येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

व्हायरल इन्फेक्शन वाढीची प्रमुख कारणे

  • संततधार पावसामुळे झालेला वातावरणातील बदल
  • शिंका किंवा खोकला असलेल्या आजारी व्यक्तीकडून संक्रमण
  • आजारी व्यक्तीच्या हाताशी किंवा त्याने वापरलेला टिश्यू पेपर, कपडे आदींशी थेट संपर्क येणे
  • दूषित पाणी पिणे किंवा अन्न खाणे

मुलांची काय काळजी घ्याल ?

  • मुलांना वारंवार हात स्वच्छ धुण्यास सांगावे.
  • खेळून आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुण्यास सांगावे.
  • सॅनिटायझरचा वापर करावा.
  • मुलांना व्हायरल इन्फेक्शन झाले असल्यास त्यांना शाळेत पाठवू नये. त्यांची घरीच काळजी घ्यावी.
  • पावसात भिजणे टाळावे. भरपूर पाणी पिण्यास सांगावे.
  • खोकताना किंवा शिंकताना हातरुमाल ठेवावा.
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. फ्लू व्हॅक्सीन घ्यावे.

सध्या लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब यांचे रुग्ण वाढले आहेत. रुग्णालयाच्या बालरोग विभागातील बाह्यरुग्ण विभागात दररोज तपासणीसाठी येणार्‍या 100 ते 150 बालरुग्णांमध्ये 70 ते 80 रुग्ण हे व्हायरल इन्फेक्शनचे आढळत आहेत. 2 ते 3 दिवसांचा ताप कमी न झाल्यास अशा बालरुग्णांना उपचारासाठी दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

– डॉ. दीपाली अंबिके, बालरोग विभागप्रमुख, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्था.

गेल्या महिन्यात उपचारासाठी येणार्‍या एकूण बालरुग्णांपैकी व्हायरल इन्फेक्शन झालेल्या मुलांचे प्रमाण हे 60 ते 70 टक्के इतके होते. ते प्रमाण वाढून सध्या 80 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. सर्दी, खोकला, ताप झालेले 200 ते 250 मुले दररोज रुग्णालयात तपासणीसाठी येत आहेत.

– जगदीश ढेकणे,
बालरोगतज्ज्ञ

हेही वाचा

वडगाव मावळ : 3720 शेतकर्‍यांनी काढला पीक विमा

कामशेत : अंगणवाडीची वाट चिखलातून

चक्क जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी रांगा

Back to top button