वडगाव मावळ : 3720 शेतकर्‍यांनी काढला पीक विमा | पुढारी

वडगाव मावळ : 3720 शेतकर्‍यांनी काढला पीक विमा

वडगाव मावळ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : केवळ एक रुपया विमा हप्ता भरुन आपल्या खरीप पिकांचा विमा काढण्याच्या राज्य शासनाच्या सुविधेचा मावळ तालुक्यातील 3 हजार 720 शेतकर्‍यांनी लाभ घेतला असून, विमा काढण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या विमा सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.

निगडेत 253 शेतकर्‍यांनी काढला विमा

28 जुलैपर्यंत मावळ तालुक्यातील 3720 शेतकर्‍यांनी एक रुपया विमा हप्ता भरुन या योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये तालुक्यातील आतापर्यंत सर्वांत जास्त पीक विमा निगडे 253, महागाव ग्रामपंचायत 200, नवलाख उंबरे 164 व मळवंडी ठुले 130 शेतकर्‍यांनी काढला आहे. या विम्यामुळे शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्‍या पीक नुकसानीची भरपाई मिळू शकेल.

बँकेतही अर्ज करण्याची सुविधा

कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आपल्या पिकाचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा घेण्यासाठी इच्छुक कर्ज न घेतलेल्या शेतकर्‍यांनी जवळच्या बँक शाखेत, जनसेवा केंद्र (सीएससी), विमा कंपनी किंवा अधिकृत एजंट यांच्यामार्फत ऑनलाईन अर्ज
करता येईल.

नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना मिळणार संरक्षण

या योजनेचा विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान पीक विम्यासाठी पात्र आहे.

मावळ तालुक्यासाठी भात, सोयाबीन, भुईमूग ही पिके विमा संरक्षित असून हेक्टरी भातासाठी 51 हजार 760 रुपये, सोयाबीनसाठी 49 हजार रुपये, भुईमूग पिकासाठी 40 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम शेतकर्‍यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

– मनीषा घोडके, कृषी सहायक, चांदखेड

हेही वाचा

पिंपरी : वल्लभनगर आगारावर अष्टविनायकाची कृपा

चक्क जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी रांगा

छत्रपती संभाजीनगर : वाळूज येथील औषध कंपनीला आग; कोट्यवधी रुपयांचे नुकसान

Back to top button