…अन्यथा नसरापूरच्या मेन आळीचे माळीण? | पुढारी

...अन्यथा नसरापूरच्या मेन आळीचे माळीण?

माणिक पवार

नसरापूर : नसरापूर (ता. भोर) येथील मेन आळीच्या पाठीमागून जाणार्‍या शिवगंगा नदीपात्रापासून उंच जमिनीची दिवसेंदिवस झीज होत असून, मातीच्या कडा कोसळत आहेत. तसेच पुराच्या तडाख्याने धक्के बसून घरांना तडे गेले आहेत. भूस्खलनाची टांगती तलवार उभी राहल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहेत. मात्र, याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने माळीणसारखी परिस्थिती ओढवण्याची वेळ प्रशासन बघत आहे की काय? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. नसरापूर गावठाणातील स्मशानभूमी ते मेन आळीमध्ये साधारणत: 50 कुटुंबे असून, शिवगंगा नदीकिनार्‍यापासून उंच भागावर पूर्व व दक्षिण 15 घरे वसलेली आहेत.

शिवगंगा खोर्‍यात पर्जन्यमान अधिक असल्याने जवळपास दोन महिने नदीला पूर राहतो. यामुळे दिवसेंदिवस मातीचा व जमिनीचा उंच भाग निखळला जाऊन तीव्र उतार झाला आहे. नदीकाठालगतची अनेक मोठी झाडे आडवी झाली आहेत. यामुळे साधारण आठ ते दहा घरांना धोका निर्माण झाला आहे. संरक्षित भित बांधण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. दरम्यान, याबाबत सन 2019 मध्ये माजी उपसरपंच शंकर शेटे, युवराज वाल्हेकर, हनुमंततात्या कदम, इरफान मुलाणी, ज्ञानेश्वर झोरे, सुधीर वाल्हेकर, नामदेव चव्हाण, शरद चव्हाण आदींनी प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्या वेळी फक्त पंचनामा करून उपाययोजना करण्याचे आश्वासन देत दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहेत. वेळीच दखल न घेतल्यास मेन आळीचे माळीण होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीने दखल घेऊन परिस्थितीची पाहणी केली असून, सुरक्षेतेसाठी नोटिसा देण्यात येणार असल्याचे सरपंच सपना झोरे यांनी सांगितले. पाहणी करून पंचनामा केल्याची माहिती मंडलाधिकारी प्रदीप जावळे यांनी दिली.

मंडलाधिकार्‍यांमार्फत अहवाल मिळाला असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. संरक्षित भिंत बांधण्यासाठी तातडीने वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठविणार आहे. बांधकाम विभागालाही याबाबत कळविले आहे.
                                               – सचिन पाटील, तहसीलदार, भोर 

हेही वाचा :

तंत्रशिक्षण संस्थांना जुने शुल्क घेण्याची मुभा !

पुणे पालिका शाळांमध्ये मंगळवारपासून डोळे तपासणी अभियान

Back to top button