तंत्रशिक्षण संस्थांना जुने शुल्क घेण्याची मुभा ! | पुढारी

तंत्रशिक्षण संस्थांना जुने शुल्क घेण्याची मुभा !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विनाअनुदानित खासगी तंत्रनिकेतने आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्न संस्थांना शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक वर्ष 2022-23 नुसार शुल्क घेण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी उपसंचालक डॉ. गोविंद संगवई यांनी दिली. शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता पदविका अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क आकारण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.

त्या अनुषंगाने पदविका अभ्यासक्रमाच्या सर्व संस्थांना 2023-24 वर्षाकरिता शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये आकारण्यात आलेले शुल्क अंतरिम शुल्क म्हणून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. शैक्षणिक शुल्क निर्धारण समिती निश्चित होऊन यंदाच्या शैक्षणिक वर्षातील विविध संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रमांसाठी किती शुल्क घ्यायचे हे ठरवणार आहे. त्यानंतरच नवीन शुल्क घेण्याची संस्थांना परवानगी मिळणार आहे. शैक्षणिक संस्थांना अंतरिम शुल्क हे शुल्क निश्चिती समितीच्या अंतिम शुल्काच्या मान्यतेच्या अधीन राहूनच घ्यावे लागणार आहे. शुल्क समितीने प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी संबंधित संस्थांना शुल्क निश्चित करून दिल्यानंतर संबंधित शुल्क संस्थांकडून घेण्यात आलेल्या अंतरिम शुल्कापेक्षा जास्त असल्यास जास्तीचे शुल्क संबंधित संस्थाना विद्यार्थ्यांकडून घेता येईल.

शुल्क निश्चिती समितीने प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी संबंधित संस्थांना शुल्क निश्चित करून दिल्यानंतर संबंधित शुल्क संस्थांकडून घेण्यात आलेल्या अंतरिम शुल्कापेक्षा कमी असल्यास, विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले जास्तीचे शुल्क संस्थेला संबंधित विद्यार्थ्यांना परत करावे लागणार आहे. शुल्कासंदर्भातील ही माहिती प्रवेशाच्या वेळी संबंधित विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देणे संस्थांना बंधनकारक असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Manipur viral video case | मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी CBI कडून एफआयआर दाखल

निसर्गाच्या कोपाने गाडलेल्या माळीणला 9 वर्षे पूर्ण

Back to top button